>> बाधितांची संख्या १७ हजारांवर तर ५४३ बळी
काल सोमवारी सकाळपर्यंत भारतातील कोरोनामुक्त जिल्ह्यांची संख्या ३३९ झाली असल्यामुळे या भागांत लॉकडाऊनमधून थोड्याफार प्रमाणात सशर्त सवलत देण्यात आली आहे. देशातील एकूण ७४७ जिल्ह्यांपैकी ४०८ जिल्ह्यांत कोरोनासंक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १७,२६५ पर्यंत पोहचला असून ५४३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील तब्बल ३३९ जिल्ह्यांमधून एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्राच्या निर्देशानुसार, जवळपास १८० जिल्हे रेड झोनमध्ये तर २२८ जिल्हे ऑरेंज झोन म्हणून घोषित केल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयो दिली आहे.
महाराष्ट्रात ५ जिल्हे कोरोनामुक्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३१ जिल्हे संक्रमित असून पाच जिल्हे अद्यापही करोनामुक्त आहेत. दरम्यान, राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राजधानी दिल्ली
राजधानी दिल्लीतील सर्व ११ ही जिल्हे कोरोनाच्या विळख्यात सापडले असून महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण दिल्लीत आढळले आहेत. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या आता २००३ वर पोहोचली आहे.
गुजरात तिसर्या स्थानी
कोरोनाबाधित राज्यांच्या यादीत तिसर्या स्थानावर गुजरात असून गुजरातमध्ये ३३ पैकी २२ जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुजरातची राजधानी अहमदाबाद आता कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनला असून राज्यात एव्हाना ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
गोवा पहिले कोरोनामुक्त राज्य
कोरोनामुक्त होणारे गोवा हे पहिले राज्य ठरले असून रविवारी गोवा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केल्यानंतर आता संपूर्ण राज्यच ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील ७५ पैकी २७ जिल्हे अद्याप सुरक्षित असून ५६ जिल्ह्यांना सवलत देण्यात आली आहे. उत्तराखंडात ७ जिल्हे कोरोनामुक्त
असून राजस्थानात ८ जिल्हे सुरक्षित आहेत.
पूर्व भारतात स्थिती सुधारली
दरम्यान, पूर्व भारतातील आसाममधील ३३ जिल्ह्यांपैकी २२ जिल्हे कोरोनापासून दूर आहेत. अरुणाचलमध्येही आत्तापर्यंत केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. मणिपूरमध्ये पश्चिम इम्फाळ आणि थाबलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून इतर प्रदेश कोरोनामुक्त आहेत. मेघालयाच्या ११ पैंकी केवळ एका जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून मिझोराममध्येही ८ जिल्ह्यांपैंकी केवळ एक तर त्रिपुराच्या ८ पैकी २ जिल्हे करोना संक्रमित आहेत.
तामिळनाडूच्या सर्व ३४ ही जिल्ह्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मध्य प्रदेशात २६, आंध्र प्रदेशात ११ तर तेलंगणात २८ जिल्हे कोरोनाबाधित आहेत.