देशातील कोरोना रुग्णसंख्या २.६६ लाख

0
170

>> केंद्र सरकार म्हणते सामाजिक प्रसार नाही!

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २.६६ लाखांच्या पुढे गेली असून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये देशाने याआधीच पाचवे स्थान नोंद केले आहे. त्याच बरोबर आशियातील कोविड-१९च्या मोठ्या प्रमाणातील प्रकरणांमुळे यासाठीचे भारत हे एक मोठे केंद्र ठरले आहे. तसेच गेल्या १० दिवसांपासून भारतात दररोज सरासरी ७९०० कोरोना बाधित सापडल्याची नोंद होत आहे.

दरम्यान, काल (दि. ९ रोजी) एकाच दिवशी भारतात कोरोना बाधितांची सर्वाधिक ९९८७ प्रकरणे नोंद झाली. अशी स्थिती असली तरी केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार भारतात अजूनही कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. दि. ९ रोजी सकाळी ८ वा. पर्यंतच्या २४ तासांत भारतात आजवर एकूण २,६६,५९८ कोरोना प्रकरणे नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यापैकी १,२९,२१५ कोरोना रुग्ण बरे झाले असून ७,४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश व राजस्थान ही राज्ये कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरली आहेत. देशात कोविड-१९ चे सर्वाधिक ६० टक्के मृत्यू हे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये नोंद झाले आहेत.

देशातील कोरोना प्रसाराचा मागोवा घ्यायचा झाल्यास १० मार्चपर्यंत देशात कोविड-१९ चे फक्त ५० बाधित नोंद झाले होते. २० मार्च रोजी ती संख्या १९६ झाली, २५ मार्चपर्यंत ६०६ वर गेली. सरकारी तपशीलानुसार १८ एप्रिल रोजी कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या १४,७९२ होती. तर ६ मे रोजी ५६ हजार व २३ मे रोजी १,२५,१०१ अशी कोरोना रुग्णसंख्या वाढली.

या आपत्तीमुळे एकूणच देशाच्या आरोग्य सुविधांवर मोठा ताण आला असून आर्थिक स्थिती ढासळली आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने भाकीत केले आहे की २०२०-२१ या काळात भारताची जीडीपी १.९ टक्क्यांवर घसरणार आहे.