देशभरात सतर्कतेचे आदेश जारी

0
81

पेशावर येथे मंगळवारी तालिबानी अतिरेक्यांनी शाळेवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल भारतात केंद्रीय गृह मंत्रालयाने सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांध्ये जानेवारी अखेरपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे येत्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. त्यामुळे देशातील सुरक्षा व्यवस्था कडक केली जाणार आहे. प्रामुख्याने शाळा व सार्वजनिक स्थळांवर अती दक्षता बाळगण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. सोमवारी सिडनीत व मंगळवारी पेशावर येथे दहशतवादी कारवाया झाल्यानंतर अफगाणिस्तानातही तालिबान्यांना हल्ले सुरू केले असल्याने गृह मंत्रालयाने देशभरात सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत.
अतिरेकी कारवायांसंदर्भात गोव्यातही सतर्कतेचे आदेश
पेशावर येथे दहशतवाद्यांनी शाळकरी मुलांना ठार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गुप्तचर खात्याने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. काल सचिवालयात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विदेशी नागरिकांच्या प्रश्‍नावर पोलीस अधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीच्या वेळी गोवा पोलिसांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.
शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठा या भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा आदेश दिल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी सांगितले.