- प्राजक्ता प्र. गांवकर
(नगरगांव, वाळपई)
छानपैकी खेळणार्या मुलाला मुद्दामहून ओरडणारा असा कोणी आहे या जगात तर तो पापींच समजावा लागेल. लहान मुलांना इकडून तिकडे बागडताना, किलबिल करताना पाहून आंतरिक सुखाची तीव्र अनुभूती होते. ‘मुले ही देवाघरची फूले’ हे अगदी खरे आहे.
‘बालपणीचा काळ सुखाचा…’ असे म्हणतात ते काही चुक नाही. खरच बालपण म्हणजे जणू मोरपंखी जीवन. मोरपिसाला जसे विविध रंग असतात, तसे बालपण असते. आईवडिलांसकट सर्वांच्या अंगावर खेळण्या- बागडण्याचे ते दिवस, आपल्याला हवे ते हट्ट करुन मागून घ्यायचे, आपल्याला आवडेल तसे वागायचे.
पण जसजसे वय वाढत जातेे तसतशी लहान मुलांना शिस्त ही लावावीच लागते. कुठेही बाहेर जायचे झाल्यास लहान मुलांची मजाच असते. त्यांना प्रवासाचे कुतूहल वाटते. विशेष करुन लहान मुली छान छान फ्रॉक घालून, पावडर टिकली, हेअर बेँड़ घालून मस्तपैकी तयार होतात. त्यांची किलबिल चालूच असते. ‘‘आई, कधी जायचं?’’ ‘‘आपण किती दिवस थांबणार’’? असे एक ना दोन नाना प्रकारचे प्रश्न विचारुन अगदी भंडावून सोडतात.
कुठेही प्रवासाला जाताना लहान मुलांना न्यायचे तर आईबाबांना नकोच वाटते. आता समजा बस आली तरी गोंधळ, बसायच्या जागेवरुन गोंधळ, मी खिडकीकडेच बसणार म्हणत तार स्वरात दोन भावंडांमध्ये रणकंदन. शेवटी आईच्या शेजारी खिडकीकडे बाळा आणि वडिलांना आईच्या शेजारची जागा नाईलाजाने सोडून दुसरी खिडकी बघून बाळीला घेऊन बसावे लागते.
आईबाबांना पण वाटतं ना, की कुठेही जाताना आपण दोघांनी जवळ बसावं, पण या मुलांपुढे इलाजच नाही. दिवाळीला तर फारच मजा असते लहान मंडळींची.
मुले नवीन कपडे घालून इकडून तिकडे नाचत असतात. मुलींचे तर काही सांगूच नका. नवीन कपडे, नवीन बांगड्या, नेलपेंट, मेंदी अजून काय काय? सगळच नवीन. रात्री फटाके फोडतात. गोडाधोडाचा फडशा पाडतात.
या सणात चांगले फराळ खायचे आणि धमाल करायची एवढेच लहान मुलांना माहीत असते. ‘‘मुले ही देवाघरची फुले’’ हे अगदी खरेच, पण ही मुले आपली झाली. अनाथ मुलांची काय? त्या बिचार्या अनाथ निष्पाप मुलांचे कौतुक कोण पुरवणार? किती फरक आहे आपल्या व अनाथ मुलांमध्ये… आपली मुले काय पाहिजे ते आपल्याकडे मागून घेतात पण अनाथ मुले कुणाकडे हट्ट करणार? कुणी काही दिलं तर मुकाट्याने घेऊन गप्प बसतात. फारच केविलवाणी स्थिती असते त्यांची. म्हणून मला असे वाटते की, त्या अनाथ मुलांच्या चेहर्यावर हास्य पहायचे झाल्यास त्यांच्यासाठी खास काहीतरी करावे. आपण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करतो ते घरात आपल्या नातेवाईकांमध्ये. तेच आपण अनाथ मुलांच्या आश्रमात जाऊन साजरे केले तर?
घरातल्या वाढदिवसाला आपण जी धमाल करतो, तीच तिथे त्या अनाथ मुलांमध्ये करावी. असे करण्याने त्या मुलांच्या चेहर्यावर फुललेला आनंद पाहून तुम्हालाही समाधान वाटेल. पण इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते की, मुलं लहान आहे म्हणून त्यांचे पाहिजे तसे लाड करु नये. हट्ट पुरवावा पण त्यालाही एक मर्यादा असावी.
लहान मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. मातीच्या गोळ्याला ज्याप्रमाणे चाकावर ठेऊन आकार देतात. त्याला योग्य तो आकार दिल्याने त्याचे रूपांतर सुंदर अशा मडक्यामध्ये होते. अगदी त्याचप्रमाणे लहान मुले घडतात.
मुलांना घडवताना त्यांना शिस्त लावावी लागते. त्यांच्याबरोबर चांगले संभाषण करावे. त्यासाठी चांगले आचार-विचार असावे लागतात.
लहान मुलांनी आपल्या बोबड्या बोलांनी सर्वांना मोहिनी पाडलेली असते. त्यामुळे होते काय? तर लहान मुलांनी आपल्या बोबड्या बोलांनी शिवी जरी घातली तरी सर्वजण त्यांचे कौतुक करतात.
याचा परिणाम तेव्हा काय होईल? हे कुणाच्याही ध्यानात येत नाही. मग जेव्हा ते मूल जरा मोठे होते. त्यावेळी ते सर्रास शिव्या वापरते. तेव्हा सर्वजण म्हणतात, आईवडिल काय शिकवतात कोण जाणे? बघेल तेव्हा तोंडात शिवीच असते.
मग मला सांगा. ज्यावेळी ते मुल असं बोलतं तेव्हाच जर त्याला असं बोलू नये म्हणून चांगल्या शब्दात समजावून सांगितले, चांगले संस्कार त्याच्यावर केले तर बिघडणार का?
तसेच विशेष मुलांच्या बाबतीत सांगावेसे वाटते… या मुलांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. काही मुले मतिमंद असतात त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन द्यावे लागते. वस्तु तयार करण्यासाठी, पेंटिग करण्यासाठी इत्यादी. काही काही मतिमंद मुलांना तर त्यांच्या आईवडिलांना सांभाळावे लागते. देवाने निकोप मुले जन्माला घातली. त्याच वेळी अशी मंद मतीची मुलेही जन्माला घातली. मुलांच्या बाबतीत विशेष करुन लहान मुले सर्वांनाच आवडतात. त्यांच्या मनात आत एक बाहेर एक असे काही नसते. अगदी स्वच्छ असे त्यांचे मन असते.
छानपैकी खेळणार्या मुलाला मुद्दामहून ओरडणारा असा कोणी आहे या जगात तर तो पापींच समजावा लागेल. लहान मुलांना इकडून तिकडे बागडताना, किलबिल करताना पाहून आंतरिक सुखाची तीव्र अनुभूती होते. ‘मुले ही देवाघरची फूले’ हे अगदी खरे आहे. बालपणीच्या सुखाच्या काळात लहान मुलांना मोठेपणीचा उषःकाल उज्ज्वल व्हावा म्हणून हा लेख.