देदीप्यमान राष्ट्रपुरुष ः स्वा. सावरकर

0
35
  • – अंजली आमोणकर

परिस्थितीचे अचूक वाचन व भावी घडामोडींचा अचूक वेध सावरकरांनी सदैव घेतला. ‘देशसेवा म्हणजेच देवसेवा’ असे मानणारे प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ तात्याराव सावरकर जसे वंदनीय तसेच अनुकरणीयही. त्यांच्या या जयंतीला त्यांना कोटी-कोटी नमन.

‘ने मजसी ने, परत मातृभूमीला’- हे गीत ऐकताना कोणाची छाती भरून येत नाही? या गीताचे जनक- विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक. ते हिंदू तत्त्वज्ञ तर होतेच, पण भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळीचे प्रणेते होते. ते दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते, ज्यांना २-२ जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांनी ती पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्रजीवनात सक्रिय झाले.

त्यांचा जन्म भगूर- नाशिक येथे २८ मे १८८६ साली झाला. सावरकर हे कुटुंब कोकणातील गुहागर पेट्‌ट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सावरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून सावरकर हे आडनाव आले असावे. थोरले गणेश व सर्वात धाकटे डॉ. नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे व मुंबई येथे एल.एल.बी.पर्यंत झाले. पुढे बॅरिस्ट ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच त्यांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळुणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देशविदेशातील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले. ते वृत्तीने कवी होते. लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही कमावले होते.

१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड याचा खून केला आणि यासंदर्भात सरकारला माहिती देणार्‍या गणेश आणि रामचंद्र द्रविड यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याची शपथ घेतली. त्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले. त्यांच्याभोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. मित्रमेळाही स्थापन केले. हे काम करीत असताना ठिकठिकाणी त्यांचे लेख, कविता, इतर साहित्य प्रसिद्ध होत होते.
एल.एल.बी. झाल्यावर बॅरिस्टरीचे शिक्षण घ्यायला त्यांनी भारताचा किनारा सोडला. लंडनला सावरकरांबरोबर असलेले सेनापती बापट यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठवली होती. दरम्यानच्या काळात नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा खून झाला. या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठवलेल्या पिस्तुलांपैकीच असल्याने हे सर्व प्रकरण त्यांच्यापर्यंत येऊन ठेपले. तेथे त्यांचा व त्यांच्या सहकार्‍यांचा छळ सुरू झाला. या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. त्यांना अटक झाली व चौकशीसाठी भारतात नेले जात असताना मार्सेलिस बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याचे निमित्त करून शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’मधून समुद्रात उडी घेतली व ते फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकार्‍यांनी त्यांना तिथे अटक केली. ही अटक कायदेशीर नाही, या मुद्यावर सावरकरांतर्फे ‘द हेग’च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली. हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालवले गेले व त्यांना पन्नास वर्षांची जन्मठेप झाली. त्यांची सर्व मिळकत जप्त करण्यात आली.

अंदमानात त्यांना छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरविणे अशी अत्यंत कष्टांची कामे करावी लागली. तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले. पण अशाही परिस्थितीत त्यांनी ‘कमला’ हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. १९२१ मध्ये त्यांना अंदमानातून आणून रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी ‘माझी जन्मठेप’ व ‘हिंदुत्व’ हे ग्रंथ लिहिले. जवळजवळ तेरा वर्षे ते रत्नागिरीत होते. ते रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते व पाच वर्षे राजकारणात भाग घेणार नाही असे त्यांनी लिहून दिले होते. इथे त्यांनी अस्पृश्यता निवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना परत आपल्या धर्मात घेणे, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळी केल्या.
सावरकरांची बिनशर्त मुक्तता होताच ते हिंदुमहासभेत गेले. तिथे त्यांनी दोन निःशस्त्र लढे दिले. एक भागानगरचा व दुसरा भागलपूरचा. भागानगरचा लढा निजामाविरुद्धचा होता. परिणामतः निजामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या तिथे पन्नास टक्के जागा निजामाला द्याव्या लागल्या.
‘अखंड एकात्म भारत’ ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली. प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांंच प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

ते विश्‍वातील पहिले असे लेखक होते ज्यांची १८५७ च्या प्रथम स्वतंत्रता संग्राम रचनेला दोन-दोन देशांनी प्रकाशनपूर्व बंदी घातली. ते प्रथम असे स्नातक होते ज्यांची पदवी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने हिसकावून घेतली होती. ते असे प्रथम भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी इंग्लंडच्या राजाप्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता. परिणामस्वरूप त्यांना वकिली करता आली नाही. वीर सावरकर प्रथम असे भारतीय राजकारणी होते ज्यांनी सर्वप्रथम विदेशी वस्त्रांची होळी केली होती. वीर सावरकरांनी राष्ट्रध्वजाच्या मधोमध धर्मचक्र लावण्याचा सल्ला दिला होता व डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तो मान्य केला होता. ते प्रथम असे राजकारणी होते ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले होते. ते पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन संपल्याबरोबर अस्पृश्यता व इतर कुप्रथांविरुद्ध आंदोलन सुरू केले.

ते दुनियेतील पहिले कवी, ज्यांनी अंदमानातील भिंतींवर खिळे आणि कोळशाने कविता लिहिल्या व त्या पाठ केल्या. या प्रकारे पाठ केलेल्या दहा हजार ओळी त्यांनी जेलमधून सुटल्यावर पुन्हा लिहून काढल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘द इंडियन वॉर ऑफ इनडिंपेडन्स’ हे पुस्तक सनसनाटी ठरून, ब्रिटिश शासनात त्यापायी गोंगाट पसरला होता.

राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमातील सावकरांशी संबंधित भागांमध्ये बदल केला आहे. तीन वर्षांपूर्वी भाजप सरकारच्या काळात पाठ्यपुस्तकांमधून विनायक दामोदर सावरकर यांचा उल्लेख ‘वीर’, ‘महान देशभक्त’ आणि ‘क्रांतिकारी’ असा करण्यात आला होता.

कॉंग्रेस सरकारने नव्याने तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये सावरकरांसाठी ‘वीर’ शब्द वगळण्यात आला आहे. शिवाय जेलमधील त्रासाला कंटाळून त्यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली होती असा उल्लेख या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. तसेच गांधी हत्येच्या कटातही ते सहभागी होते असा उल्लेख पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

सावरकर कधीही संघात नव्हते तरीही संघात त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. ते एक विचारी क्रांतिकारक, हिंदुत्वनिष्ठ असलेले पुरोगामी कर्मयोगी महापुरुष होते. महाभारतात कृष्णाने सांगितलेली गीता ते जगले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता या थोर राष्ट्रपुरुषाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले.
त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीही केली. त्यांत कवितांचाही समावेश होता. त्यांच्या कवितांचा अभ्यास करायचा झाल्यास तो तीन कालखंडात करता येईल. अंदमानपूर्व कालखंडातील कविता, अंदमानमधील कविता आणि अंदमानातून बाहेर आल्यावर स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेल्या कविता. ‘जयोस्तुते’, ‘ने मजसी ने’, ‘अनादि मी अनंत मी’ अशा त्यांच्या कविता गीतारूपातून घरोघरी पोहोचल्या. ‘माझे मृत्युपत्र’, ‘हे हिंदुशक्ती- संभूत- दीप्तीतम तेजा’, ‘पहिला हप्ता’, ‘आत्मबळ’ या कवितादेखील अतोनात गाजल्या.

सावरकर अत्यंत व्यवहारी, चतुर क्रांतिकारक, उपयुक्ततावादी बुद्धिमत्तेचे, स्वदेशीबद्दल प्रचंड आग्रही होते. कारण त्यामागचे अर्थकारण ते जाणून होते. भारत मुक्त झाल्यावर त्याची वाटचाल कशी होणार याबद्दलचा आराखडाही त्यांच्याकडे तयार होता. अंदमानाच्या तुरुंगातही त्यांनी कैद्यांना साक्षरतेचे व अर्थशास्त्राचे धडे दिले होते. राष्ट्रपातळीवरच्या उत्पादनांना यंत्रयुगाचीच गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. याच विचारांचा अवलंब करून आज चीनने जागतिक पातळीवर आघाडी घेतल्याचे आपण पाहतो. परिस्थितीचे अचूक वाचन व भावी घडामोडींचा अचूक वेध त्यांनी सदैव घेतला. ‘देशसेवा म्हणजेच देवसेवा’ असे मानणारे प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ तात्याराव सावरकर जसे वंदनीय तसेच अनुकरणीयही. त्यांच्या या जयंतीला त्यांना कोटी-कोटी नमन.