दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

0
2

चार वर्षांपूर्वी चंद्रवाडो-फातोर्डा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रविन कुमार सदा व आकाश घोष या दोघांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी काल निवाडा दिला. त्याशिवाय प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान, या प्रकरणातील एक संशयित अल्पवयीन असून, त्याच्यावर वेगळ्या न्यायालयात खटला सुरू आहे.

दि. 8 मार्च 2021 रोजी फातोर्डा चंद्रवाडो येथे कंत्राटदार मिंगेल मिरांडा (65) आणि त्यांची सासू कॅटरिना पिंटो (85) यांचा चाकूने भोसकून वरील दोघांनी खून केला होता व ते पळून गेले होते. रविन कुमार सदा व आकाश घोष हे मिरांडा यांच्या घरातील खोली भाड्याने घेऊन रहात होते. तसेच त्यांच्याकडे काम करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मिंगेल मिरांडा याने पगाराचे पैसे दिले नव्हते. त्यातून वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी व चोरीच्या इराद्याने त्या दोघांनी रात्री मिरांडा व पिंटो यांचा खून केला व ते पळून गेले. यानंतर सकाळी शेजारी त्यांच्या घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

फातोर्डा पोलिसांनी 24 तासांच्या आत तपास करून संशयित आरोपींना पकडण्यात यश मिळाले. गोवा पोलिसांनी अने तपास पथके तयार करून ती विविध राज्यांत पाठवली होती. त्यानंतर पळून गेलेल्या तीन आरोपींना दादर मुंबई येथे पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून चोरीला गेलेली दुचाकी, सोनसाखळी, मोबाईल फोन, बँक पासबुक व हत्येसाठी वापरलेला च्याकू यासह रक्ताने माखलेले कपडे जप्त केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 24 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.सरकार पक्षातर्फे ॲड. उत्कर्ष आवडे यांनी युक्तिवाद केला. तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याने वेगळ्या न्यायालयात खटला चालू आहे.