- पौर्णिमा केरकर
आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं ‘दुरपती’ म्हणजेच द्रौपदी. म्हणजे आम्ही द्रौपदीच्या थाळीत जेवलो होतो, ती तर कधीच रिकामी होणारी नव्हती…
गोव्यात कुठं कुठं कोणकोणती गावं आहेत त्यांची ओळख मला जी करून दिली ती लोकसाहित्याच्या संशोधनाने. अभ्यास करायचा तर मग माणसांचा शोध… या शोधातून माणसाबरोबरीने गावही ओळखीचे झालेत. माणुसकी संपली, माणूस माणुसकीला अंतरला,
आता कोणीही कोणाचे राहिलेले नाहीत, हेच विचार परत परत ऐकू येतात आणि मन बधिर होते. माणुसकी तर अक्षरे शिकलेल्याकडे टिकून राहाते असेही कोणी म्हणतात. ‘कोरोना’ने माणसातील माणुसकीला नव्याने अनुभवण्याची संधी दिली.
विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने माणसे एकत्र येतात, आनंदाची देवाणघेवाण करतात. काणकोण, केपेसारख्या तालुक्यांतील अनेक गावांत दसरा ते दिवाळीच्या दरम्यान धिल्लोत्सव साजरा केला जातो. गोवाभर नक्षत्रांचा उत्सवच चालू असतो तो अश्विन कार्तिक महिन्यात. आकाश चमचमणार्या तारकांनी भरलेले आणि खाली पृथ्वीवर तर असंख्य दिव्यांचे अधिराज्य. त्यांचे तर पृथ्वीशी असलेले नाते मानवी मनाला संजीवक सोबत करतात. ही सोबत आनंददायी तर असतेच, शिवाय चिरकाल मनात रेंगाळत राहते. कारण तिथे हरवलेली माणुसकी सापडते! केपे तालुक्यातील वावूरला हा छोटासा गाव. डोंगरमाथ्यावर वसलेला. अवघड वळणाचा. चढाव-उताराचा. गावात जातानाच्या रस्त्यावर मध्ये मध्ये मोठमोठे दगड, तर काही ठिकाणी नुसतीच माती. दुर्लक्ष झाले तर पाय घसरून पडू एवढी सूक्ष्म रवाळ, मध्ये पिठूळ असलेली ही माती. पावसाळ्यात तर तिथं साधं चालणंही मुश्किल होऊन बसतं. डांबरी रस्त्याचा हा गाव नाही. शहरी वातावरणाची छटा तर अगदी आत्ताच कुठंतरी जाणवू लागलेली दिसते. नेटवर्क नाही, रस्ता नाही, आणि प्राथमिक शाळाही नसलेला हा गाव फक्त पन्नास घरांचा आहे. घरं कौलारू. शेणाने सारवलेल्या अंगणातील सुबक मातीची तुळस. डोंगराच्या कुशीत विसावलेला गाव. गावाची ओळख म्हणजे इथलं घनदाट जंगल. थंडगार सावलीचे. सिंहपुरुषाच्या छत्रछायेखाली निर्धास्त वावरणारे. आजूबाजूला पसरलेल्या ‘कोरोना’ला या गावाने अजूनही पाहिलेले नाही. तोंडावर मास्क घालून फिरणार्या शहरी सवयींना सरावलेल्यांना हा गाव वेगळं काहीतरी शिकवू पाहत आहे. धिल्लोत्सवाच्या निमित्ताने या गावाची भेट घडली. सत्तरी ते काणकोण तीन तासांचा प्रवास… त्यात पुढे अडीच तास घाटरस्त्याने गावाकडे जायचे, तेही चालत. चालण्याचे त्रास नव्हते पण वेळेत पोचलो असतो तरच उत्सव सुरुवातीपासून पाहायला मिळणार होता. म्हणून देवीदासने गावातील मुलांच्या माध्यमातून मोटरसायकलची तयारी करून ठेवलेली. वेळेत गावात पोचायचे तर मग सकाळीच बाहेर पडायचे तरच उत्सवाचा आस्वाद घेता येणार. गावाला शेजार मोठमोठ्या झाडांचा, डोंगरांचा, देवराईचा… मांडावर पोहोचताक्षणी लक्ष वेधले ते तिथे उपस्थित असलेल्या लहानांपासून थोरांपर्यंतच्या महिलांच्या चेहर्यांनी. संपूर्ण जग चेहरा लपवून संसर्गापासून स्वतःला दूर ठेवू पाहात आहे, परंतु इथं तर कोणाच्याच चेहर्यावर मास्क नव्हता. आमच्याकडे सर्वांच्याच नजरा वळल्या, कारण आम्ही तोंडावर मास्क चढवले होते.
अलीकडे कोणाच्याही घरी जायचे असेल तर मनात शंका-कुशंका येतात. आपल्या घरी कोणी आलेले आहे हे पाहूनही अनेक घरे धास्तावतात. पण इथं मात्र कोणाच्याच चेहर्यावर भीतीची, अनोळखीपणाची, अविश्वासाची साधी रेषाही दिसली नाही. आपल्या गावच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणीतरी बाहेरची माणसे आली आहेत, ही कल्पनाच त्यांना सुखावह वाटत होती. तो कुतूहलमिश्रित आनंद त्यांच्या चेहर्यावर जाणवत होता. मांडावर सगळ्याच महिला, कुमारी मुली, छोटी मुलं… गावातील एकही जाणता पुरुष मांडावर दिसत नव्हता. हे असे कसे…? शंकेचे निरसन करण्याकरिता विचारलेच.
दरवर्षीची पारंपरिक ‘सावड’ त्याच दिवशी होती. गावातील पुरुषमंडळीची पावले वळली ती जंगल भ्रमंतीसाठी. मांडावर मात्र घराघरांतील महिला, मुली दसर्यापासून आता दिवाळीच्या पाडव्यापर्यंत एकत्रित येऊन नृत्य-गायन करून उत्सवातून आनंदाची पेरणी करीत आहेत. कार्तिक लक्ष दिव्यांनी सजलेला. एका बाजूला नृत्य-गायन तर दुसरीकडे चुलीवर मोठमोठी भांडी चढवलेली… गावजेवणासाठी. पाडव्याला उत्सवाची समाप्ती होते. गुराढोरांना सजवून, त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करून मग सगळ्याजणी मांडावर धील्याला नमन करण्यासाठी जमा होतात. मातीला आकार देऊन त्याच्यात त्यांनी देवत्व शोधले आहे. या मातीच्या गोळ्याला सजवायचे, तेही त्या-त्या ऋतूत फुलणार्या रानफुलांनी. धील्याची चाकरी पंचवीस दिवसपर्यंत महिलावर्ग करीत असतो. एवढ्या दिवसांत एक अनामिक नाते तयार झालेले असते. साहजिकच ती भावनिकता उत्सवभर रेंगाळत राहते. देहभान विसरून उत्सवाचा उत्साह म्हणजे काय हे जाणवते याचवेळी. इतकं अंतर पार करून आल्याचा थकवाही कोठल्या कोठे गायब होतो. कुतूहल दिसलं मला या सर्व महिला-मुलींच्या डोळ्यांत आमच्याविषयी… त्या नाचत गात होत्या. शुभदा त्यांची प्रत्येक हालचाल कॅमेर्यात टिपत होती. तिथेही मुलांच्या हातातील मोबाईल शूटिंग करण्यासाठी तत्पर होते. वेळ असाच निघून गेला. संध्याकाळ होत आली तेव्हा कोठे भुकेची आठवण झाली. उत्सवासाठी जेवण रांधलेले होते. तशी मोठमोठी भांडीही मांडाच्या शेजारी दिसत होती. पण ते जेवण धील्याला देवाच्या विहिरीवर पोहोचवून आल्यानंतर तिन्हीसांजेला होणार होते. त्यात संपूर्ण गाव सामील होणार होता.
भोवंडीसाठी गेलेली मंडळी मांडावर अजून यायची होती. आमची घरी परतण्याची घाई सुरू झाली. उत्सव समाप्तीपर्यंत राहणे शक्य नव्हते. गावात सकाळी पोहोचविण्यासाठी जरी मोटरसायकलचा प्रवास केला तरी परतीचा प्रवास चालतच करायचा होता. काळोख पडण्यापूर्वी खाली उतरायचे होते. सगळी आवराआवर केली. सर्वांचा निरोपही घेतला. हसत हसत सगळ्यांनी निरोपाचे हात हलविले. ‘पुढच्या वर्षी असे घाईघाईने येऊ नका, राहण्यासाठीच या’ असेही आग्रहाने सांगितले.
एवढ्यात एक तरतरीत नाकाची, काटक शरीरयष्टी असलेली महिला पुढे सरसावली. ती नृत्य करणार्या बायकांच्या घोळक्यात नव्हती. मांडाच्या शेजारी असलेल्या झाडाच्या सावलीत कमरेला चंची लावून आपल्या पारंपरिक वेशभूषेत आमचे निरीक्षण करीत होती. कष्टप्रद जीवनाच्या रेषा तिच्या शरीरावर स्पष्ट जाणवत होत्या. चेहरा प्रसन्न. पुढे आली… आणि माझ्या हाताला धरून आपल्या भाषेत बोलली, ‘‘आमच्या गावात आलात, देवकार्यात सामील झालात आणि उपाशीच जाणार? चला माझ्या घरी, देवाचे जेवण देव पोहोचवून झाल्यावर मिळणार. तोपर्यंत तुम्हाला उशीर होईल. तुम्ही माझ्या घरी जेवण करा.’’ क्षणभर आम्हाला काही सुचले नाही. एक साधीशीच दिसणारी महिला आमच्यासारख्या अनोळखी माणसांना ‘घरी जेवून जा’चा मनापासून आग्रह करते. आणि घरी नेऊन आग्रहाने पोटभर जेवण वाढते. आमचे चेहरे त्या तृप्तीने आतून सुखावते. ही मोठी गोष्ट होती. एरव्ही एखाद्याच्या घरी एक व्यक्ती ऐनवेळी जेवायला आली तर कपाळावर आठ्या उमटतात. इथे आम्ही तर तिघेजण होतो. घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिने सांगितलं ‘दुरपती’ म्हणजेच द्रौपदी. म्हणजे आम्ही द्रौपदीच्या थाळीत जेवलो होतो, ती तर कधीच रिकामी होणारी नव्हती…