कार्तिकातला दीपराग

0
303
  • मीना समुद्र

आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक् करून आपला धरणीभेटीचा आनंद मोठ्या तोर्‍याने दाखवू लागल्या. देवीचे प्रांगण मंगलतेजानं माखून गेलं आणि आम्हा पाहणार्‍यांची मनंही!

आज त्रिपुरी पौर्णिमा. कार्तिक शुक्ल पक्षातली ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा. या दिवशी श्री शंकरभगवानांनी त्रिपुरासुराचा वध केला. तारकासुराचे हे तीन पुत्र- तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन. आपल्या क्रौर्याने यांनी त्रिभुवन त्रासले. ब्रह्मदेवाच्या वरामुळे निर्भय होऊन माजलेल्या या असुरांनी देवांनाही त्रस्त केले तिथे मग ऋषी आणि मानवांची काय कथा? सर्वजण पालनकर्त्या विष्णूला शरण गेले आणि विष्णूने असुरसंहाराचे काम शिवावर सोपविले. कल्याणकर्त्या शिवाने त्या महाभयंकर असुरांचा संहार केला, त्यांची तिन्ही पुरे भस्मसात केली, त्यामुळे आनंदित होऊन सर्वांनी शिवमंदिरातच नव्हे तर सर्वत्र दिवे उजळले आणि शिवशंकराला ‘त्रिपुरारी’ असे नामाभिधान तेव्हापासून प्राप्त झाले.

त्यामुळे आजची ही कार्तिकी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा. देवत्व आणि दिव्यत्वाच्या तेजाने झळाळणारे ‘त्रिपुर’ याचा अर्थ आहे दिवा. मग असं असूनही आपल्या कृष्णकृत्यांनी त्रिपुरासुरांनी सगळीकडे दाट काळोखी का आणली? आपल्या बळाचा उपयोग एकत्रित करून चांगल्या कामासाठी का नाही केला? अर्थात नाव सार्थक वगैरे करण्याची बुद्धी असुरांकडे कुठून असणार? दिवा प्रकाशही देतो आणि जाळतोही. दुर्गती असुरांनी त्रिभुवनाला नैराश्याच्या आणि पूर्ण हतबलतेच्या आगीत जाळायला सुरुवात केल्यावर मात्र भगवान शंकरांनी शरणागतांना तारण्यासाठी तृतीय नेत्र उघडला आणि असुरसंहार केला. याची आठवण म्हणून देवापुढे त्रिपूर जाळतात. कार्तिक शुक्ल पौर्णिमेला संध्यासमयी सर्वत्र दिवे लावून ‘त्रिपुराख्यदीपप्रज्वलनं तदंगत्वेन शिवपूजांच करिष्ये’ असा संकल्प करून शिवपूजन मोठ्या उत्साहात केले जाते. कापूर जाळला जातो. घरेदारे, छत-सज्जे, मंदिरांचे गोपूर लखलखत्या पणत्यांनी, दिव्यांनी सजतात. जावे तिथे लुकलुकणार्‍या दीपज्योती शिवविजयाची कहाणी सांगत असतात आणि अंतर्यामी खुलून, फुलून आनंदाने, उत्साहाने डोलत असतात. कार्तिकेयाचे दर्शनही या दिवशी घेतले जाते ते केवळ तो शिवपुत्र म्हणून नाही तर आपल्या पुत्रांच्या वधाने चवताळलेल्या मदोन्मत्त तारकासुराला अगदी लहान वयात त्याने ठार केले म्हणून; त्या विलक्षण सामर्थ्याची आणि तेजाची पूजा, कौतुक घडावे म्हणून! दिव्यांच्या ज्योतींनी या तेजाची आरती होते ती याच दिवशी.

कार्तिकी पौर्णिमा ही अत्यंत मंगलकारक असल्याने नदी, सागर अशा जलाशयात स्नान ही एक पर्वणी ठरते आणि त्यानंतर दीपदान विधी करताना पाण्यात सोडलेले दिवे हे एक अति मनोरम दृश्य असते. लहानपणी सुदैवाने नदीजवळ घर असल्याने पहाटे आणि संध्याकाळी हे नयनमनोहर दृश्य कार्तिकस्नानानंतर अनेकवार अनुभवले आहे; आजही ती आठवणींची दीपमाळ अनोख्या तेजाने चमचमत आहे. संध्याकाळची आरती आणि रात्रीची दिव्यांची अपूर्व शोभा पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम जात असू. नदीतीरावरची छोटी-मोठी देवळंरावळं आणि नदीचा दगडी बांधीव घाट दिव्यांनी नुसता लखलखत असे.

आश्‍विनातील कोजागरीइतकीच सुंदर निळ्यानभाची पौर्णिमेची दैवी हात लाभलेली चांदणकळा आणि धरणीला मानवी हातांची लाभलेली कार्तिकाची ही दीपकळा. दोन्ही अनोख्या, अपूर्व. अश्‍विन अमावस्येला सुरू होणार्‍या लक्ष्मीपूजनापासून नरकासुरवध- कृष्णविजय, कार्तिकाच्या प्रारंभी शुभलाभाचा पाडवा, भाऊबीज, पांडवपंचमी अशा एकेक चढत्या पायर्‍यांनी ही दीपकळा चढत-वाढतच असते. घठपूजनविधीलाही दिव्यांच्या साक्षीने जल-लहरींवर सोनेरी तेजलहरी नाचत असतात. प्रबोधिनी एकादशीही दिव्यांच्या साक्षीने साजरी होते. घराघरांतल्या लाडक्या लेकीचे- तुळसाबाईचे लगीन तर दिव्यांच्या रोषणाईचेच नुसते झगमगत झोकात पार पडते आणि चांदणबाराती पुढे चांगले तीनचार दिवस नभांगणी मुक्काम ठोकून हा कौतुकसोहळा डोळेभरी पाहत असतात. आणि कार्तिकी पौर्णिमा तर देवदिवाळीच साजरी करते.

दिवाळीच्या प्रकाशानं, आप्तांच्या भेटीनं सार्‍यांची मनं कशी प्रकाशभारली असतात! त्या उत्साहात, त्या आनंदात सहभागी होणारं दिव्यांसारखं दुसरं साधन कोणतं? म्हणूनच मला वाटतं, गेल्या रविवारी वास्कोतल्या चिखली सर्कलजवळच्या श्रीसातेरी मंदिरात ‘सहस्रदीप प्रज्वलन सोहळा’ होणार असल्याचं कळल्यावर पाहण्यासाठी मुद्दाम गेलो. दिवाळी नुकतीच होऊन गेल्यानं आज मध्येच काय कारण असावं असं वाटलं म्हणून चौकशी केली असता कळलं की रोटरी, सम्राट, इनरव्हील अशा ४-५ संस्थांच्या सभासदांना देवीच्या प्रांगणात १५५१ दिवे लावण्याची इच्छा होती. दिवेलागणीला एक-एक करत बरेच सभासद जमले. पुरुषभर उंचीची समई आणि पणत्यांची स्वस्तिकाकार रचना. तेलवातींनी पणत्या सज्ज होत्या. देवळात आरती होऊन दिव्यांनी भरलेली ताटं बाहेर आणली गेली. गुरुजी आणि संस्थाप्रमुखांनी समई प्रज्वलित केली आणि पणत्या, मेणबत्त्या यांच्या सहाय्याने सर्व दिवे प्रज्वलित झाले. आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक् करून आपला धरणीभेटीचा आनंद मोठ्या तोर्‍याने दाखवू लागल्या. देवीचे प्रांगण मंगलतेजानं माखून गेलं आणि आम्हा पाहणार्‍यांची मनंही!

फोनवर बहिणीशी बोलता बोलता सहज हे दीपरागाचं आनंदगान गायिल्यावर ती म्हणाली, दिवाळीला आम्ही सार्‍या बायकाही सावंतवाडीच्या सुंदरतळ्याभोवती कठड्यांवर अशाच मेणबत्त्या लावतो. पणत्या असोत वा मेणबत्त्या, दिव्यांचे काम प्रकाशणे, परिसर आनंदमय करणे. दीप लावण्याने भवतालाचे लावण्य वर्धित करणे. ‘सुंदरतळं’ किती सुंदर दिसत असेल या कल्पनेनंच मन फुलकित झालं आणि ते पाहायला कधीतरी जायचं असं मनात ठरवलं.

या दिवसातल्या आनंदात भर टाकणारी एक गोष्ट म्हणजे जिकडे तिकडे पुष्पपल्लवांकित झालेल्या वृक्षवेली. जास्वंद, अबोली, कोरांटीबरोबर मोगरा आणि जुईही फुलते आहे. रंगगंधाने अनोखे तेज यांच्या रंध्रात कुण्या अदृश्य हातांनी पेरले आहे. जागोजागच्या जलाशयांत शुभ्र कमळांची दाटी झाली आहे. पहाटेच्या वेळी कार्तिकस्नान करून कमलपत्रावर विराजमान झालेल्या नक्षत्रपर्‍याच या! कार्तिकाची शोभा पाहताना डोळ्यांची धुणी पुरत नाही. झाडावेलींवर झुलणार्‍या या दीपमाळा आणि जलाशयावर तरंगणार्‍या दीपज्योती, आकाशात झगमगणार्‍या तारका कार्तिक मासभर दीपराग आळवीत असतात.