दुचाक्यांच्या टक्करीत सत्तरीत विद्यार्थी ठार

0
89

>> माळोली, सत्तरी येथे अपघात; दोघे गंभीर

 

माळोली, सत्तरी येथे काल मोटारसायकल व स्कूटरची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात उस्ते येथील विराज वासू उस्तेकर (वय १७) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनिकेत उस्तेकर (१५) व अर्जुन सालेलकर हे गंभीर जखमी झाले. हा अपघात काल दुपारी ३.१५ वाजता घडला. विराज उस्तेकर हा नगरगाव येथील सरकारी हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज जीए-०४-डी-५६९१ क्रमांकाच्या मोटारसायकलने माळोली – नानोडा रस्त्याने जात होता. तर समोरून जीए-०४-जे-७९२० क्रमांकाच्या डिओ स्कूटरने अमित हरवळकर हा येत होता. अंदाज चुकल्याने दोन्ही दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. यावेळी विराज याला गंभीर मार लागल्याने त्याचे जागीच निधन झाले. तर स्कूटरचालक अमितच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
विराजचे वडील कृषी खात्यात कामाला आहेत. विराज मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या निधनामुळे उस्ते गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला.