- शशांक मो. गुळगुळे
भारतात गेल्या 8 वर्षांत दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाली आहे, तर जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा आहे. दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
भारतीय दुग्ध व्यवसायाने गेल्या दशकात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 230.58 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले. मागील पाच वर्षांत दूध उत्पादनात 22.81 टक्के वाढ झाली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये दूध उत्पादनात अग्रेसर आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के हिस्सा आहे.
इंटर डेअरी एक्स्पो
दूध उत्पादनाच्या प्रगतीचा हा आलेख असा सुरू राहावा यासाठी व्हीए एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग यांनी 5 ते 7 डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन्स सेंटर येथे ‘इंटर डेअरी एक्स्पो 2024′ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात दुग्ध व्यवसायातील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी ठरू शकते. टिकाऊ तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहण्यास उपलब्ध असतील. या प्रदर्शनात 120 हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
चीनच्या तुलनेत भारतात दुग्ध उत्पादने तीन पट जास्त होतात. भारतीय दुग्धक्षेत्र बाजारपेठेची उलाढाल सध्या अंदाजे 125 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असून यात वार्षिक 9 टक्के वाढ होऊन 2030 सालापर्यंत ही बाजारपेठ 230 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. दुग्धोत्पादनापासून ते दुग्ध प्रक्रिया व पॅकेजिंगमध्ये स्वीकारण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे भारत सरकारने भारतीय दुग्ध व्यवसायाला दिलेले सक्रिय पाठबळ यामुळे हे शक्य झाले आहे.
काही वर्षांपूर्वी दुधाला व्यवसाय म्हणून स्थान नव्हते. तो घरगुती उद्योग होता. शहरापलीकडे राहणारे लोक गाई-म्हशी पाळत. त्यांचे दूध काढीत. त्यांची स्वतःची गरज भागून जे दूध शिल्लक राहत असे ते गावात ज्यांना हवे आहे त्यांना विकत. आता दुग्धोत्पादन क्षेत्राने 80 दशलक्ष कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. यात प्रामुख्याने भूमिहीन आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुग्धोत्पादन क्षेत्र हे विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे आणि देशभरातील महिला सबलीकरणामध्ये या उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. दूध व दुग्धजन्य उत्पादने, दुग्धोत्पादन व कृषी साहित्य, पशुवैद्यकीय उपाय, प्रक्रिया व पॅकेजिंगची साधने, ऑटोमेशन व डेटा प्रक्रिया, घटक आणि ॲडिटिव्हज्, कोल्ड चेन व्यवस्थापन, वितरण व लॉजिस्टिक, आर्थिक सहाय्य संस्थांनी दिलेले पर्याय, हाय-प्रिसिजन लेबसिंग मशीन, डेअरी तपासणी उपकरणे, टिकाऊपणा, कार्यक्षमता, आकर्षक पॅकेजिंग, दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता टिकविण्यासाठी नवकल्पना या सर्व बाबांचीं माहिती प्रदर्शनात मिळू शकणार.
या प्रदर्शनात बी टू बी एक्स्पोसोबतच इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे ‘भारतातील दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर असलेल्या संधी’ या विषयावर हाय-लेव्हल दोन दिवसांचे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी ‘इंटर डेअरी अवॉर्डस् 2024′ या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. 1970 मध्ये भारतात दररोज सुमारे 6 कोटी लिटर दूध उत्पादित होत असे व त्यावेळी भारत हा दुधाची कमतरता असलेला देश होता. मात्र 2022 मध्ये हे उत्पादन 58 कोटी लिटर झाले. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य आहे. भारतातील एकूण उत्पादनात उत्तर प्रदेशचा हिस्सा 18 टक्के आहे. गुजरातनेही दूध व दुग्धजन्य उत्पादनात आघाडी घेतली. गुजरातने हा उद्योग सहकार तत्त्वावर राबविला. ‘अमूल’ची उत्पादने गुजरातमध्ये उत्पादित होतात. ‘अमूल’ हा एक फार मोठा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. महाराष्ट्रात जसे राजकारणी साखरसम्राट झाले तसे दूधसम्राटही झाले. पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर या राज्यांत महाराष्ट्रात दूध प्रकल्प उभे राहिले. यू.ए.ई., सौदी अरेबिया, यू.एस.ए., सिंगापूर, भूतान व अन्य काही देशांना भारतातून दूध निर्यात होते. दुधाचा सर्वात मोठा निर्यातदार देश न्यूझिलंड आहे. उत्तर प्रदेशात म्हशींची संख्या देशात सर्वाधिक आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या म्हशींच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील म्हशी जास्त जाडजूड असतात व त्यांची लांबीही जास्त असते. इतर गुरांच्या संख्येत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातले बहुसंख्य ग्रामीण लोक पशुधन आणि दुग्ध व्यवसायात कार्यरत आहेत. भारतात 765 डेअरी कंपन्या आहेत, तर जगात 45 हजार डेअरी कंपन्या आहेत. गुजरात सहकारी मिल्क मार्केटिंग फेडरेशन- ‘अमूल’ हा भारतातील सर्वोत्कृष्ट दुधाचा व आईस्क्रीमचा ब्रँड आहे. या फेडरेशनने स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने सहकारी उद्योग उभारण्याचे सर्वोत्तम कौशल्य जगाला दाखवून दिले आहे. गुजरातचे हे उदाहरण बऱ्याच राज्यांनी अमलात आणण्याचा प्रयत्न केला. न्यूझिलंडच्या गवताळ गायी जगातील सर्वोत्तम दर्जाचे दूध तयार करतात. दुधाळ गायींच्या गुणवत्तेचा थेट संबंध त्यांच्या आहार आणि वातावरणाशी असतो. भारतातील शेतकऱ्यांकडून- दूध उत्पादकांकडून- दुधाचे सर्वात जास्त वार्षिक उत्पादन 230 दशलक्ष टन घेतले जाते. त्या खालोखाल भात 129 दशलक्ष टन, गहू 110 दशलक्ष टन, मका 35.91 दशलक्ष टन, साखर 34 दशलक्ष टन इत्यादी उत्पादने आहेत. जगातील एकूण दूध उत्पादनापैकी 24 टक्के उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 2014 पासून युरोपीय महासंघ आणि अमेरिकेला मागे सारून भारत दूध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला. दुग्ध व्यवसायाचा भारतीय अर्थकारणासाठी हातभार लागला आहे. सहकारी तत्त्वावर गावोगावी सुरू झालेल्या या व्यवसायाला आता मोठ्या उद्योगाचे स्वरूप आले आहे. वार्षिक 15.04 दशलक्ष टन उत्पादनासह महाराष्ट्र दूध उत्पादनात भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. दूध उद्योगासोबत पशुखाद्य, सप्लिमेंट्स चारा, औषधे, दूध उद्योगाला लागणारी यंत्रणा, रेतमात्रा इत्यादी अनेक उद्योगांना चालना मिळाली. परंतु दूध उत्पादन वाढीला शासनाकडून आधारभूत विक्री किंमत न मिळाल्यामुळे आणि हे नाशिवंत उत्पादन असल्याने, मिळेल त्या किमतीला विकणे याशिवाय उत्पादकांकडे पर्याय नाही. कोरोना काळात दूध उत्पादनाला सर्वात जास्त फटका बसला. यावेळी गायीच्या दूधाचा खरेदी दर 17 ते 18 रुपये प्रति लिटर इतका कमी झाला. त्यानंतर लम्पी स्कीन आणि दरवर्षी येणारा लाळ्या खुरकून विषाणूजन्य आजारामुळे आर्थिक फटका बसला. जगातील मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादित करणारे देश त्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ कधी उपलब्ध होणार याची वाट पाहत आहेत. अशावेळी भारतातील दूध व्यवसाय टिकविण्यासाठी आधारभूत किंमत मिळणार का? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सामना करण्यासाठी भारतीय दूध उत्पादक दुधाचा उत्पादन दर्जा सुधारणार का? हे प्रमुख प्रश्न आहेत. भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 8 वर्षांत दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाली आहे, तर जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा आहे. या वाढत्या उत्पादनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आगामी काळात डेअरी क्षेत्र आणखी पुढे जाईल असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार दूध उत्पादनात उ. प्रदेश पहिल्या क्रमांकावर, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर, म. प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर, गुजरात चौथ्या क्रमांकावर, आंध्र प्रदेश पाचव्या क्रमांकावर, तर पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा दूध उत्पादनात 11 टक्के वाटा आहे, तर पाकिस्तानचा वाटा 7 टक्के आहे. श्वेतक्रांतीनंतर भारतात दूध उत्पादनात प्रचंड वाढ होत गेली. सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण सहकारी चळवळीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात सहकारी दूधसंस्था मात्र नफ्यात येऊ शकल्या नाहीत. शेतीशी निगडित असलेला दुग्ध व्यवसाय हा परंपरागत पद्धतीने भारतात सुरू आहे. कै. डॉ. वर्गीज कुरियन यांनी 1970 मध्ये ‘ऑपरेशन फ्लड’ ही योजना राबवून ‘अमूल’च्या माध्यमातून दुग्ध उत्पादनात श्वेतक्रांती घडवून आणली. त्यानंतर सर्वच राज्यांमध्ये सहकारी दूध संघ जोमाने काम करू लागले. देशात विक्रमी दूध उत्पादन होत असले तरी महाराष्ट्र राज्य मात्र सहा राज्यांत मोडत नाही. एकेकाळी दूध उत्पादनात अग्रेसर असलेला महाराष्ट्र कालांतराने मागे पडला. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची दुग्धजन्य पदार्थांची निर्यात 272.64 दशलक्ष यू.एस. डॉलर्स इतकी होती. जगात दूध उत्पादन 2 टक्क्यांनी वाढत आहे, तर भारतात 6 टक्के दराने वाढत आहे. दुग्ध व्यवसायाने देशात 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतात 300 दशलक्षपेक्षा जास्त गोवंशासह जगातील सर्वात मोठा डेअरी कळप आहे. दुधाचे उत्पादन व वापर या दोन्हींत भारत अग्रेसर आहे. भारतात बहुतेक दुधाचा वापर देशातच केला जातो. भारतातील डेअरी उद्योगाचा आर्थिक परिणाम मोठा आहे. बहुतेक दूध म्हशीपासून येते. गायीचे दूध दुसऱ्या क्रमांकावर, तर शेळीचे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय दुग्ध बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ मानली जाते. उत्तर प्रदेशात एकूण दूध उत्पादनाच्या 15.72 टक्के दूध उत्पादित होते, तर राजस्थान 14.44 टक्के, मध्य प्रदेश 8.73 टक्के, गुजरात 7.49 टक्के व आंध्र प्रदेश 6.7 टक्के. द्रव दुधासारखी किंवा द्रव दुधाला पर्याय म्हणून दुधाची पावडरही मिळते व या पावडरीचा खपही वाढत चालला आहे. द्रव दूध तापवावे लागते व परत थंड करावे लागते. ते नासू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दुधाची पावडर वापरणे सोपे. एका चहा किंवा कॉपीच्या कपाला पुरणारे ‘सॅचेट्’ मिळतात. ते गरम पाण्यात मिसळले की चहा/कॉफी तयार. जास्त वजनाचे खोके/डबेही मिळतात. एक मात्र नक्की की दुग्ध उत्पादनात आपण स्वावलंबी आहोत. हा व्यवसाय वाढायला अजून बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.