भारतीय नेमबाजांनी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी आश्वासक सुरुवात करुन दिली. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली. मोक्याच्या क्षणी संयमाने खेळ करत दीपकने दमदार पुनरागमन करत मातब्बर खेळाडूंची झुंज मोडीत काढली. दीपकने २४७.७ गुणांची कमाई केली. चीनचा यांग हाओरान २४९.१ गुणासह पहिल्या तर लू शावचुआन २२६.८ गुण घेत तिसर्या स्थानी राहिला. मोक्याच्या क्षणी अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे रवी कुमारला २०५. ४ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीसाठी आठ खेळाडू पात्र ठरले होते. पात्रता फेरीत रवी ६२६.७ गुणांसह चौथे स्थान मिळवून तर दीपक ६२६.३ गुण घेत पाचव्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.