दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची नवीन ओळखपत्रे सप्टेंबरनंतर

0
103

सरकारच्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली नवीन ओळखपत्रे तयार करण्याच्या कामाला सप्टेंबरनंतर सुरू पुन्हा सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती डीडीएसएसवाय या आरोग्य विमा योजनेचे सल्लागार डॉ. बाळकृष्ण व्ही. पै यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

सरकारच्या डीडीएसएसवाय योजनेखाली नवीन ओळखपत्र तयार करण्याचे काम १ ऑगस्ट २०१८ पासून बंद ठेवण्यात आल्याने या योजनेखाली नवीन नोंदणी करू इच्छिणार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या आरोग्य विमा योजनेच्या नवीन ओळखपत्राबाबत अनेकांकडून विचारणा केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना डॉ. पै यांनी सांगितले की, ही आरोग्य सेवा योजना सर्वांसाठी खुली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास पात्र लाभार्थींना कुणाही रोखू शकत नाही. त्यामुळे या योजनेखाली वितरित ओळखपत्राच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरनंतर पुन्हा नवीन ओळखपत्र तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
आरोग्य सेवा विमा योजना जून महिन्यापासून सरकारतर्फे चालविण्यात येत आहे.

पूर्वी ही योजना विमा कंपनीमार्फत चालविण्यात येत होती. या आरोग्य विमा योजनेसाठी विमा कंपनीला हप्त्यापोटी दर महिना ७ कोटी रुपयांचा भरणा केला जात होता. आता, राज्य सरकारकडून आरोग्य विमा योजना चालविण्यात येत असल्याने दर महिना साधारण १ कोटी रुपये वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे. विमा कंपनीला एकूण १०३ कोटी रुपये फेडण्यात आले. तर विमा कंपनीने ९० कोटी रुपयांच्या खासगी व सरकारी बिलांचे दावे निकालात काढले आहेत. आरोग्य विमा योजनेखाली २ लाख ४२ हजार कुटुंबीयांनी नोंदणी केलेली आहे. खासगी इस्पितळाच्या जून महिन्याची अंदाजे ९३ लाखांची बिले फेडण्यात आली आहे. तसेच जुलै महिन्यातील सुमारे २ कोटी रुपयांची बिले फेडली जाणार आहेत, असेही डॉ. पै यांनी सांगितले.