>> बोर्डा-मडगाव येथील प्रकार; फातोर्डा पोलिसांकडून निर्दयी मातेला अटक
ेत जन्माला आलेल्या दीड महिन्याच्या बालिकेला जन्मदात्या मातेनेच उघड्यावर फेकून दिल्याची घटना काल बोर्डा-मडगाव येथे उघडकीस आली. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी बालिकेची माता प्रियांका फर्नांडिस (30, रा. चंदगड-कोल्हापूर) हिला अटक केली.
सविस्तर माहितीनुसार, प्रियांका फर्नांडिस ही आपला पती रिचर्ड फर्नांडिस याच्यासोबत बोर्डा येथे एका भाड्याच्या घरात राहते. या घराजवळील एका महिलेला तिच्या घरामागच्या परसबागेत एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. तिने धावत जाऊन पाहणी केली असता एक लहान बाळ प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ते उघड्यावर टाकून दिल्याचे दिसून आले. तिने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली.
दरम्यानच्या काळात बालिकेला परसबागेत टाकून दिल्यानंतर प्रियांकाने झोपलेल्या पती रिचर्ड याला जागे करून घरातून बाळ गायब झाल्याचा बनाव केला. लगेच रिचर्ड याने पोलिसांना फोन करून घरी पाचारण केले. तपासादरम्यान बोर्डा येथे उघड्यावर सापडलेले बाळ हे तेच बाळ असल्याचे निष्पन्न झाले. ते ताब्यात घेऊन तात्काळ बालिकेला जिल्हा इस्पितळात दाखल केले.
घर बंद असताना बाळ कसे गायब झाले असा संशय पोलिसांना येताच त्यांनी मातेवर प्रश्नांचा भडिमार केला, त्यात ती अडकली आणि तिने स्वत:च बाळ उघड्यावर टाकून दिल्याची कबुली दिली. दरम्यान, या बालिकेची पूर्ण वाढ न झाल्याने तिला काही दिवस इस्पितळात ठेवले होते व नंतर घरी आणले होते. मात्र प्रियांका हिने त्या बालिकेला उघड्यावर का फेकून दिले हे स्पष्ट होऊ शकले नाही.
या प्रकरणी फातोर्डा पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका नाईक, उपनिरीक्षक अमीन नाईक, अतिकेश खेडेकर यांच्या मदतीने तपासकाम केले.