दिव्यांगांबाबत गोवा अग्रेसर : डॉ. प्रमोद सावंत

0
84

दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असून केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांतून पहिल्यांदाच देशपातळीवर अपंग, विकलांग व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत असे प्रतिपादन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे काल केले. केंद्रीय समाजकल्याण खात्यातर्फे उत्तर गोव्यातील राज्यातील सुमारे १५४४ ज्येष्ठ नागरिक, विकलांग व दिव्यांग व्यक्तींना विविध उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

साखळी रवींद्र भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास समाज कल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर, केंद्रीय समाजकल्याण सचिव सुरेंद्र सिंग त्रिपाठी, जिल्हाधिकारी नीला मोहनन, आर. डी सरीन, संचालक एस. व्ही. नाईक आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वृध्दापकाळातील विविध आजारांवर व्यंगावर मात करता यावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांतून उपकरणे, पुरवण्यात येत आहेत. असे सावंत म्हणाले. समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सांगितले की विकलांग व ज्येष्ठ नागरिकांना मुख्य प्रवाहात आणताना या नव्या योजनेद्वारे १५०० लोकांना विविध उपकरणे प्रदान करण्यात आली असून अजूनही ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी ही योजना चालूच राहिल.
राष्ट्रीय वयश्री योजनेंतर्गत बीपीएल रेषेखालील १००३ लोकांना विविध उपकरणे काल मंत्री व सभापतींच्या उपस्थिती वितरीत करण्यात आली.

विकलांग मुलांना व नागरिकांना ३८ लाख ५२ हजार ५५० रुपये खर्चून ५४१ जणांना या उपकरणांचा लाभ देण्यात आला तर वयश्री योजनेंर्गत ३९ लाख ३२ हजार रुपये खर्चून १००३ जणांना लाभ देण्यात आला.
उत्तर गोव्यात १५४४ जणांना याचा लाभ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास उत्तर गोव्यातील विविध तालुक्यातून सुमारे १५०० लोक उपस्थित होते.