दिवाळी… आगळी-वेगळी!

0
568
  • प्रा. रमेश सप्रे

दिवाळी ‘तीच’ आहे हे खरं… पण ‘तशीच’ साजरी करता येणार आहे का? शेवटी दिवाळी म्हणजे सहजीवनाचा आनंद नि परस्परसंबंधातील प्रकाशाचा अनुभव… तोच मिळवूया जरा हटके पद्धतीने, कारण यावर्षीची दिवाळी आहे आगळीवेगळी! सर्वांना दीपावलीच्या चैतन्य-शुभकामना!

‘दिवाळी- आगळीवेगळी? हा काय प्रकार? दिवाळी ही दिवाळीच असणार ना?’-नानांची प्रश्‍नावली. ‘काय लिहिताय?’ ‘लेख लिहितोय.’ ‘शीर्षक?’ ‘दिवाळी- आगळीवेगळी.’ ‘हे अगदी अळीमिळी गुपचिळीसारखं वाटतं!’ -अप्पांशी संवाद.
हे चालू असताना तात्या आले. हे निवृत्त शिक्षक. काहीतरी आठवल्यासारखं करत, काहीसे स्मरणरंजनात गुंगत उद्गारले, ‘तुमच्या लेखाचं नाव ऐकून एक गोड आठवण जागी झाली. बालसंस्कार शिबीर चालू होतं. ते संपल्यावर लगेच दिवाळी होती. एकदम एक कल्पना सुचली. मुलांच्यातील कवी जागा करण्याची.

सुंदर अक्षरात चार शब्द लिहिले ः- दिवाळी-अंघोळी-रांगोळी-कडबोळी. हे शब्द वापरून चार ओळींची कविता करायला (रचायला) सांगितली. मुलं तीन रांगेत बसली होती. पहिल्या रांगेला सांगितलं, हे शब्द ओळीच्या सुरुवातीला वापरायचे, मधल्या रांगेतल्या मुलांनी शब्द ओळींच्या मध्ये वापरायचे नि शेवटच्या रांगेत बसलेल्या मुलांनी एकेका ओळीत हे चार शब्द शेवटी वापरून चार ओळींची छान कविता करायची नि तिला एक सुरेखसं नाव द्यायचं.’ हे सांगताना तात्या एवढे तल्लीन झाले होते की त्यांना आमच्या ठिकाणी लहान मुलंच दिसू लागली. एकूण काय दिवाळी म्हटली की प्रत्येकाचे अनुभव असतात, स्मृती असतात, प्रतिक्रिया असतात. आहे खरी सगळ्या सणांची राणी- दिवाळी!
आधी सांगितले पाहिजे- यावेळची दिवाळी आगळीवेगळी का आहे?

  • यापूर्वीच्या दिवाळीत फटाक्यांचा कितीही धूर झाला तरी कुणी मुखावरण (मास्क) घातलंंय?
  • यापूर्वी कधी एकमेकांपासून ‘दोन गज की दूरी’ राखून दिवाळी साजरी केलीय?
  • शक्यतो बाहेर न पडता, अगदी देवदर्शनालाही न जाता दिवाळीचं स्वागत केलंय?
  • रांगोळी अंगण असेल तर काढूया, रस्त्यावर नकोच असं कधी म्हटलंय?
  • पणत्या मोजक्याच लावूया, फराळाचे पदार्थ थोडेच करूया असं कधी घडलंय?
  • फराळासाठी शक्यतो कुणाकडे जायचं नाही, कुणाला बोलवायचं नाही असं यापूर्वी कधी ठरवलंय?
  • फटाके तर जवळजवळ आणायलाच नको, नव्या वस्तूंची खरेदी ऑनलाईन करूया…
    या आणि अशा गोष्टींमुळे या वर्षीची दिवाळी आगळीवेगळी असणार आहे.
    याला कारण महागाई, महत्त्वाच्या वस्तूंची टंचाई नाही. अशी परिस्थिती असतानाही दिवाळी लोकांनी जोरात नि जोशात साजरी केली आहे.
    यावेळची परिस्थिती मात्र अभूतपूर्व अशी आहे. मानवाच्या इतिहासात अशी आणीबाणी प्रथमच आलीय. याला कारण आहे एक अदृश्य विषाणू कोरोना नावाचा नि त्याच्यामुळे होणारा ‘कोविड-१९’ हा रोग. कोणताही देश वा समाज याच्या तावडीतून सुटलेला नाही. यामुळे याला महामारी म्हणजे पँडेमिक असं म्हटलंय. नुसता कोविड-१९ हा जगभर पसरला नाही तर जगातील सर्व व्यवस्थांवर- राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, कौटुंबिक- या महामारीचा अनिष्ट परिणाम झालाय. सर्व सामाजिक संस्थांमधील कामावर, व्यवहारांवर कोविड-१९ चा प्रभाव पडलाय.
    ‘लॉकडाऊन’ नावाचा प्रकारच काय, शब्दप्रयोगसुद्धा अनेकांनी ऐकला नव्हता. एखादा कारखाना, एखादं आस्थापन टाळेबंदी जाहीर करत असे. पण संपूर्ण देशच्या देश बंद करणे हे यापूर्वी स्वप्नातसुद्धा आले नव्हते. आता हा प्रकार जवळजवळ वर्षभर चालू असल्याने आपल्या अंगवळणी पडलेला आहे. इतका की एखाद्या पक्ष्याला आपल्या पंखांचा विसर पडावा अशी आपल्यापैकी अनेकांची अवस्था झाली आहे.

…आणि म्हणूनच ही अशा कोविडग्रस्त काळातली आगळीवेगळी दिवाळी आपल्यासाठी अनेक संधी घेऊन आलीय. काही नवनव्या कल्पनांचा आपण विचार करूया. पण ही केवळ उदाहरणं आहेत. आपला जीवनातला अनुभव नि कल्पनाशक्ती किंवा कल्पकता वापरून आपण ही दिवाळी छान आनंदात साजरी करूया.
() ऑनलाईन दिवाळी ः आज आभासी दुनियेचा (व्हर्च्युअल वर्ल्ड) जमाना आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी (आभासी वास्तव) की रिअल व्हर्च्युऍलिटी (वास्तवाचा आभास) या दोन्हींचा अनुभव गेली काही वर्षं आपण घेत आहोत. याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी एका पुस्तकाचा संदर्भ घेऊया. रिचर्ड बाख या लेखकाचं एक छोटं पुस्तक आहे- ‘फार अवे प्लेसेस.’ हाच तो लेखक ज्याच्या ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ या पुस्तकानं जगभर धमाल उडवून दिली. ते असो. ‘फार अवे प्लेसेस’मध्ये काही पक्षीप्राणी अशीच पात्रं आहेत. ईसापच्या किंवा पंचतंत्र, हितोपदेशमधल्या कथांसारखी. त्यातलं मध्यवर्ती सांगणारं एक वाक्य आपल्याला विचारात पाडील नि दिवाळी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यासाठी नव्या कल्पना सुचवेल.

एक पक्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला दुसर्‍या पक्ष्याकडे येतो. बहुतेक कोंबड्यांकडे. आमंत्रण ऐकून तो तुरेवाला कोंबडा काही क्षण एक टक पाहतो नि म्हणतो, ‘मी निश्‍चित येईन. पोचलोच म्हणून समज.’
नंतर एक वाक्य येतं, ज्यावेळी आपल्या मनात एक विचार किंवा कल्पना चित्ररूपानं प्रत्यक्षात घडण्यापूर्वी येतात त्यावेळी, त्याच क्षणी आपण त्या चित्राचा भाग बनलेलो असतो. प्रत्यक्षपणे. जिवंत! ही ती व्हर्च्युअल रिऍलिटी! आभासात्मक वस्तुस्थिती. तो कोंबडा प्रत्यक्षात गेला नि त्यावेळी त्याच्या मनाबुद्धीत, त्याच्या जीवनातील घडलेल्या किंवा घडू घातलेल्या प्रसंगाबद्दल पूर्णपणे गच्च विचार भरून असतील तर तो तिथं साक्षात उपस्थित असूनही नसल्यासारखा वागतो. अनेकांकडे बघूनही न बघता ‘हाय! …हॅलो! …थँक्यू’ म्हणतो. एखाद्या यंत्रमानवासारखा (रोबोसारखा) समारंभात वागतो नि वावरतो. आपला व्यापार, आपलं कुटुंब, आपली संस्था याचेच विचार मनात दाटीवाटीने गर्दी करतात. म्हणून त्या गर्दीतही तो एकटाच असतो- मेले में अकेला!
याउलट डोळे बंद करून त्या भावी समारंभाचं उत्कट मानसचित्र अनुभवतो तेव्हा तो प्रसंग, केवळ इव्हेंट नव्हे, त्याच्यासमोर उलगडत जातो. ही झाली रिअल व्हर्च्युऍलिटी! आपण ‘पोकेमान गो’ यासारख्या खेळात एवढे तन्मय होतो की त्या दिसणार्‍या आभासी वास्तवाचा पाठलाग करत कधीकधी जीवही गमावतो. या तंत्राला ‘ऑगमेंटेड रिऍलिटी’ म्हणजे ‘प्रभाव वाढवलेली वास्तवता’ म्हणतात. हे फार अवघड वाटलं तरी या तंत्रज्ञानासारखाच प्रयोग आपण यावेळची ‘आगळीवेगळी दिवाळी’ आनंदात साजरी करण्यासाठी करूया. हे सहचिंतन थोडेसे जरी उपयोगी पडले तरी या लेखनाचे सार्थक होईल.

हल्ली गुगल मीट, झूम, व्हॉट्‌सऍप यांसारख्या सामाजिक माध्यमातून आपण एकाच वेळी अनेकांशी संवाद साधतो. याला खरं तर परिसंवाद म्हणायला हवं. ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’ असेच म्हणतात याला. याच्या जोडीला स्काइप, व्हिडिओ कॉल ही तंत्रं आहेतच. आपण ज्या गोष्टी एरव्ही एकत्र येऊन दिवाळीच्या दिवसांत साजर्‍या केल्या असत्या त्या आता पडद्यावर दृक्‌श्राव्य पद्धतीने अनुभवता येतात. हल्ली मोबाईलवरचा चित्रपट प्रोजेक्टरद्वारा अगदी मोठ्या पडद्यावर पाहून एन्जॉय करता येतो ना? अनेक घरांत तसा तो करतातही. यानिमित्तानं प्रोजेक्टर, तो पडदा, साऊंड बॉक्सेस अशा गोष्टी विकत घेता येतील. नाहीतर घरबसल्या काही महिने पगार मिळालाच आहे. शिवाय व्यवसायाच्या बाहेर असताना किंवा करमणूक, नवी खरेदी (बरीचशी अत्यावश्यक नसलेली) इ. गोष्टींवर होणारा खर्च वाचला आहेच ना? त्यातून अशा गोष्टी, होम थिएटरसाठी व्यवस्था करण्यासाठी खर्च निश्‍चित करता येईल. किंवा हॉटेलिंग नि चित्रपटगृहात चित्रपट, नाटकं, बघण्याचा खर्चही वाचला असल्यानं काही गोष्टी स्वतःसाठी, कुटुंबासाठी दिवाळीच्या दृष्टिकोनातून करता येतील. काही उदाहरणं-
दिवाळीचा पदार्थ- त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स
तीनचार घरातील भाऊ-बहिणी, मित्र, व्यवसायबंधू कॅमेर्‍यासमोर बसलेयत नि दुसर्‍या जोडलेल्या घरातील पडद्यावर दृश्य एन्जॉय करत म्हणतोय- ‘सावंत वहिनी, तुमची चकली नेहमीप्रमाणे कुरकुरीत, खमंग झालीत ना?’
‘ऐका हं आवाज, बघा कशी सोनपिवळी नि काटेदार झालीय. तोडते हं तुकडा… ऐकू येतोय ना कुडुम आवाज? आणि ही बघा मध्यभागी नळीही (पोकळी) पडलीय. आता तुमचा चिरोटा (फेणोरी) खाऊन दाखवा पाहू!’
सामंत काकू प्रथम तो चिरोटा दाखवतात. अनेक पदर, खुसखुशीत नि वर पिठीसाखर पेरलेला तो चिरोटा खाताना सावंतबाईंच्याच नव्हे तर इतर दोन कुटुंबही या दृक्‌श्राव्य पडदा परिषदेत सहभागी झालीयत त्यांच्या तोंडाला पाणी सुटते.
असा हा ऑनलाईन फराळ गप्पागोष्टी करत, पूर्वीच्या दिवाळीच्या कथाकिस्से सांगत मजेत चालू राहतो.

दुसरं चित्र. कुलकर्णी वहिनींकडे एका व्हॅनमधून आणलेलं ‘मिनी सुपर मार्केट’ साकारलंय. वस्त्रं, अलंकार, गृहोपयोगी वस्तू, फॅन्सी भेटवस्तू असा अख्खा मायाबाजार मांडलाय. एकामागून एक विक्रेते वस्तू उघडून उलगडून दाखवताहेत. सर्व बाजूंनी, सर्व प्रकारे वस्तूंचं प्रदर्शन चाललंय. आवडलेल्या वस्तू खरेदी केल्या जाताहेत. त्यांच्या-त्यांच्या पत्त्यावर ती व्हॅनच सारं पोचवणार आहे. एरव्ही एकत्र खरेदीला या गृहिणी अशी एकत्र खरेदी करण्याचा आनंदही लुटताहेत.
() फराळानंतर खास गप्पा, अंताक्षरीसारखे खेळ, काही गमतीदार उखाळ्या-पाखाळ्या, चहाड्याचुगल्या याही गॉसिपवजा गोष्टी सांगितल्या जातात. मज्जा चाललीय.
() एकमेकांच्या घरची आरास, रांगोळी, पणत्या, आकाशदिवे यांचीही प्रत्याक्षाहुनी प्रतिमा उत्कट या चालीवर देवाण-घेवाण सुरू आहे. हॅपी दिवाळी!
() आता फोकस जरा दुसर्‍या दिशेनं वळवूया. ‘सेल्फी नि अवरसेल्फी’ पुरे झाली. आता जरा नजर टाकूया ‘अदरसेल्फी’कडे! याबाबतीत आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. फक्त सहृदय वृत्ती आणि माझ्या परिवाराबाहेरची मंडळीसुद्धा माझी कुणीतरी लागतात ही भावना हवी. काही मंडळी माहितीतली तर काही अज्ञात- ही खरी देवाची माणसं!
हे तुम्हालाही पटेल की एका फुलाचा हार किंवा एका मण्याची माळ बनत नाही. एका मुलाचा वर्ग (क्लास) बनत नाही तसंच एका घराचं गाव बनत नाही. एका पणतीची दिवाळी बनत नाही नि एकच व्यक्ती दिवाळी साजरी करू शकत नाही. ज्ञानोबामाऊलींनी यासाठी एक हृद्य नि हृदयंगम असा शब्दप्रयोग वापरलाय- ‘सामरस्याची दिवाळी.’ समरसतेशिवाय दिवाळी कशी साजरी करणार… खरंय ना हे? …आणि समरसतेसाठी ममता, समता, एकात्मता नको का? मुख्य म्हणजे समरसतेसाठी दोन किंवा अधिक व्यक्ती नकोत का? तेव्हा होऊया समरस आपल्या अवतीभवतीच्या लोकांशी. कसं? तेच पाहूया…
() सर्वप्रथम आपल्या कोविडग्रस्त बांधवांसाठी नि कोविडयोद्यांसाठी- म्हणजे अहोरात्र सतत स्वतःच्या जीवाला धोका असतानाही सेवायज्ञात सहभागी झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, पोलीस इ. मंडळींसाठी जे-जे साह्य करणारे ट्रस्ट किंवा निधी (पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी इ.) उभारलेयत त्यांना निरपेक्ष पण कर्तव्यभावनेनं देणगी पाठवणं. गेल्या आठ-नऊ महिन्यांतील झालेली बचत नि आपली दातृत्वभावना लक्षात घेऊन अशी देणगी देता येईल. हा एक यज्ञच अहोरात्र चालू आहे. ज्यात ‘राष्ट्राय किंवा जनताजनार्दनाय स्वाहा| इदं न मम’ या भावनेनं आपण आपली समिधा टाकूया किंवा आहुती देऊया.
एक विचार करूया- आपल्याला पैसे वाचवायचेत की वाढवायचेत? आपली पुंजी अधिक वाढण्यासाठी त्यात असं दान देऊन मिळवलेली ‘प्रार्थनांची, शुभकामनांची पुण्याई’ मिसळूया.
() आपल्या परिचयातील एका गरीब व्यक्तीच्या वृद्धा आईची समजा डोळ्यांवरची शस्त्रक्रिया आहे किंवा गरीब पण अतिशय हुशार मुलीला तिच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक असा लॅपटॉप गरजेचा आहे. आज बँक टू बँक पैसे पाठवता येतात. ऑनलाईन वस्तू खरेदी करून कुणाच्याही पत्त्यावर पाठवतात. सणाच्या दिवसांत मोठ्या कंपन्यांच्या अनेक सवलत योजनाही असतात. ज्यावेळी त्यांच्याही नकळत या गोष्टी त्यांना मिळतील त्यावेळी त्या आकाशातून पडलेल्या ‘सरप्राईज भेटी’ असतील. नंतर ज्यावेळी त्यांना आपलं नाव कळेल तेव्हा आपल्याविषयीच्या पणत्या त्यांच्या डोळ्यात पेटतील नि मूक प्रार्थनांच्या ज्योती आपली आरती ओवाळतील. नाही आहे ही आगळीवेगळी दिवाळी?
() अनेकजण कुरियरमार्फत व्यवस्थित पॅकिंग (तेही करणार्‍या संस्था आहेत) करून दिवाळीचे पारंपरिक पदार्थ (करंज्या, चकल्या, कडबोळी, चिरोटे, अनारसे वगैरे) आपल्या परदेशातील नातेवाईकांना पाठवतोच की नाही? आपल्याकडे तसे पैसेही असतात. मग असेच पदार्थ आपले सरहद्दीवर लढणारे (आपण जगावं म्हणून आपण स्वतः मरणारे) जवान, अनाथालय, निराधारगृहं, महिलाश्रम यांनाही मानवतावादी दृष्टिकोनातून ‘भाऊबीजे’ची ही ओवाळणी घालायला काही अडचण आहे का?
() शक्य असेल तितक्या होतकरू (प्रॉमिसिंग) विद्यार्थ्यांना अतिशय चांगला लेखक-कवींनी समृद्ध केलेला दिवाळी अंकही आपल्याला पाठवता येईल. त्याने आपल्याकडून वाचनसाधनेची अजूनही धुगधुगती ज्वाला पुन्हा धगधगती करायला मदत होईल. अशा कृतीतून त्या व्यक्तींना नि आपल्याला मिळणारा आनंद अवर्णनीय, दिव्य असेल. हे केलं मात्र पाहिजे.
() हल्ली कुरियरनं काहीही, अक्षरशः काहीही कुठंही पाठवता येतं. थोडा अधिक खर्च होईल, पण ‘कोविड-१९’ या महामारीनं आपले बरेच पैसे वाचवलेत हेही खरं नाही का? काही रोपं पाठवूया- ज्यांच्याकडे ती लावायला भरपूर जागा आहे. फुलझाडं, फळझाडं, शोभेची झाडं, औषधी वनस्पती असं काहीही पाठवता येईल.
() काही समाजसेवी व्यक्तींच्या संस्थांशी संपर्क साधून त्यांच्या संस्थांना, कार्याला फुलाची पाकळी अर्पण करायला हरकत नसावी. दिवाळीची भेट नव्हे तर दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी!
वर काही नमुन्यादाखल कृती किंवा गोष्टी सुचवल्या आहेत. आपली सुपीक कल्पनाशक्ती वापरली तर याहीपेक्षा चांगल्या गोष्टी सुचतील. आपल्याच सगेसोयर्‍यांसोबत अनेक ‘दिवाळ्या’ आपण साजर्‍या केल्या. आता कोको (कोरोना- कोविड-१९) ग्रहणामुळे आपण एकत्र येण्यावर मर्यादा आल्या आहेत. मुख्य म्हणजे आरोग्यरक्षणासाठी मर्यादा. म्हणून ऑनलाईन एकत्रीकरणाचा आनंद (जॉय ऑफ गेटटुगेदरनेस्) घेऊयाच. त्याचबरोबर आपल्या विचारसरणीचा केंद्रबिंदू जरा कुटुंबकबिल्याच्या कक्षेबाहेर सरकवूया. मग बुद्धीच्या त्याच सूक्ष्मदर्शकातून (मायक्रोस्कोप) नि कल्पनेच्या त्याच दूरदर्शकातून (टेलिस्कोप) आपल्याला वेगळंच विश्‍व दिसेल. त्यात सहभागी व्हावं असं निश्‍चित वाटेल. ज्ञात-अज्ञात मंडळींशीही आपले ऋणानुबंध असतात हे अगदी आतून पटेल.
यासाठी दिवाळीसारखी संधी नाही. कारण, आश्‍विन कृ. द्वादशीची वसुबारस (सवत्स धेनुमाता, गोवंश) प्राणीजगताशी आपले संबंध आजही आहेत याची जाणीव करून देतील. दुसर्‍या दिवशी धनत्रयोदशीला ‘आरोग्यं धन संपदा’ (हेल्थ इज वेल्थ) याचा अनुभव धन्वंतरीच्या अमृतकुंभातून मिळेल. प्रदूषण, भ्रष्टाचार, अपराध यांच्या नरकासुरी अंधारावर श्रीकृष्णाचा प्रकाशविजय म्हणजेच दीपावली साजरी करण्याची स्फूर्ती मिळेल. आश्‍विन अमावस्येचं लक्ष्मीपूजन लक्ष्मीच्या सार्थक विनियोगाचा मार्ग दाखवेल. दिवाळी पाडव्याला सुरू होणारं नवंवर्ष पतीपत्नी नात्यातली गाठ अधिक घट्ट करेल. भाऊबिजेला बहीणभावांच्या संबंधांना अधिक दृढ करण्याची प्रेरणा देईल.
दिवाळी ‘तीच’ आहे हे खरं… पण ‘तशीच’ साजरी करता येणार आहे का? शेवटी दिवाळी म्हणजे सहजीवनाचा आनंद नि परस्परसंबंधातील प्रकाशाचा अनुभव… तोच मिळवूया जरा हटके पद्धतीने, कारण यावर्षीची दिवाळी आहे आगळीवेगळी! सर्वांना दीपावलीच्या चैतन्य-शुभकामना!