१० फेब्रुवारी रोजी मतमोजणी
अखेर दिल्ली विधानसभेसाठी नव्याने निवडणूक जाहीर झाली असून येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी काल पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज १४ जानेवारीपासून स्वीकारले जाणार असून ते २२ जानेवारीपर्यंत दाखल करता येतील. २४ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त संपथ येत्या १५ रोजी निवृत्त होणार असून कालची पत्रकार परिषद ही त्यांची शेवटची पत्रकार परिषद असू शकेल. त्यांच्या जागी वरिष्ठ निवडणूक आयुक्त हरीशंकर ब्रम्हा यांची निवड होण्याची शक्यता आहे.
४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली राष्ट्रपती राजवटीखाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीची मुदत संपणार आहे. ७० मतदारसंघाठीच्या या निवडणुकीत १.३ कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत.