काही काळ एका प्रकारे अज्ञातवासात गेलेले रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब हे आता हळूहळू पुन्हा सक्रिय होऊ लागलेले असून, सोमवारी पर्वरी येथे घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या एका विशेष बैठकीत त्यांनी दिल्ली लॉबीपासून गोव्याला वाचवण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी पक्षाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाचे आमदार वीरेश बोरकर, विश्वेश नाईक, खजिनदार अजय खोलकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी स्वत:वर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. दिल्ली लॉबीपासून गोव्याची भूमी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मनोज परब म्हणाले.