सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनातील त्रुटींबाबत जाहीर केलेल्या अनेक प्रश्नांबाबत येत्या दहा दिवसात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी तोडगा काढावा. अन्यथा देशातील सर्व न्यायालयांच्या बार असोसिएशनशी चर्चा करून रस्त्यावर येऊ व जनतेस सर्व विषयांबाबत जागृती करू असा इशारा दिल्ली बार असोसिएशनने काल पत्रकार परिषदेत दिला.
देशातील अत्यंत महत्वपूर्ण तसेच संवेदनशील प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी योग्य रित्या हाताळली जात नाही. त्याकडे लक्ष वेधूनही त्याला सरन्यायाधीशांनी अजिबात प्रतिसाद न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणाची जाहीर वाच्यता केली होती. तो दिवस देशाच्या न्याय पालिकेसाठी काळा दिवस असल्याचे मत कालच्या पत्रकार परिषदेत दिल्ली बार असोसिएशनच्या सदस्यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ‘त्या’ चार न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांमध्ये तातडीने लक्ष घालायला हवे होते असा सूर त्यांनी व्क्त केला. त्यांच्या हरकतींवर तोडगा काढण्यासाठी सरन्यायाधीशांनी तातडीने बैठक बोलावणे आवश्यक होते असे असोसिएशनने म्हटले आहे.