येथील तीस हजारी न्यायालय संकुलाबाहेर गेल्या शनिवारी वकिलांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीविरुध्द कोणतीही कारवाई न केल्याप्रकरणी निषेध म्हणून काल दिल्ली पोलिसांनी हजारोंच्या संख्येने पोलीस मुख्यालयासमोर दिवसभर प्रचंड निदर्शने केली. या आंदोलनात पोलिसांसह पोलीस अधिकारी, त्यांचे कुटुंबिय व निवृत्त पोलीसही सहभागी झाले होते. या अभूतपूर्व घटनेमुळे संध्याकाळी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यानी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्या पोलिसांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. मात्र पोलिसांनी आंदोलन सुरुच ठेवले.
गेल्या शनिवारी वकिलांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांना झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणानंतर पोलीस व वकील यांच्यादरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शनिवारच्या धुमश्चक्रीत साकेत न्यायालय संकुलाबाहेर किमान २० पोलीस तसेच काही वकीलही जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर काल सकाळपासून पोलिसांनी हजारोंच्या संख्येने राज्य पोलीस मुख्यालयासमोर येऊन उग्र निदर्शने केली. शेवटी अमुल्य पटनाईक यांना तेथील त्यांच्या कार्यालयाबाहेर येऊन निदर्शक पोलिसांना आवाहन करणे भाग पडले.
पोलिसांच्या गार्हाण्यांची दखल घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. वकिलांकडून झालेल्या कथित मारहाणप्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा अशी विनंती आपण करतो असे पटनाईक म्हणाले. दिल्ली पोलिसांची संख्या ८० हजार एवढी आहे. हे दल केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, विविध राज्यांमधील पोलीस संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या आंदोलनामुळे सदर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
अखेर ११ तासांच्या निदर्शनानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आपले आंदोलन मागे घेतले. विविध वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले व गार्हाणी सोडवण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. विशेष पोलिस आयुक्त सतिश गोलचा यांनीही पोलिसांची मनधरणी केली.