रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणास चालू महिनाअखेरीस होणार सुरुवात

0
102

>> येत्या ८ दिवसात बुजविणार रस्त्यांवरील खड्डे

राज्यातील विविध भागांतील रस्त्यांच्या हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरणाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाणार असून रस्त्यांवरील खड्डे येत्या आठ दिवसात बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात गेल्या काही महिन्यात वरच्यावर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात अडचण निर्माण झाली. खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. काही भागांतील रस्त्यांवरील खड्‌ड्यांच्या दुरुस्तीची अंदाजपत्रके नव्याने तयार करावी लागत आहेत. पावसाळा लांबल्याने रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केले जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले. राज्यातील रस्त्यांसाठी दरवर्षी ५० हजार मॅट्रिक टन डांबराची गरज भासते. गतवर्षी डांबर उपलब्ध न झाल्याने रस्त्यांच्या डांबरीकरणाची ३० टक्के कामे रेंगाळली होती.

कंत्राटदारांना मुंबई, बंगलोर येथून डांबर आणावे लागत आहे. यंदा चांगल्या प्रतीचे डांबर आखाती देशातून आणण्यासाठी विचार विनिमय सुरू आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर आखाती देशातून डांबर आणले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांकडे यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आ़़खाती देशातून डांबर आणून कारवार बंदरात ठेवण्यासाठी प्रयत्न आहे.