दिल्ली कॅपिटल्स संघात आफ्रिकेचा एर्निक नॉर्के

0
146

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज एर्निक नॉर्के याचा संघात समावेश केला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल २०२० कोरोना विषाणुंमुळे आधी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती तर त्यानंतर आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळविण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

सर्व खेळाडू आणि संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ख्रिस वोक्सने इंग्लंडमधील कसोटी हंगामात खेळण्याची संधी मिळण्यासाठी या वर्षीच्या सुरुवातीलाच स्पर्धेतून माघारीचा निर्णय जाहीर केला होता. स्पर्धेचे ठिकाण व महिना बदलल्यानंतर वोक्स निर्णय बदलण्याची अपेक्षा होती. परंतु, वोक्सने निर्णय न बदलल्याने दिल्लीला बदली खेळाडू घ्यावा लागला. वोक्सच्या जागी एन्रिक नॉर्के हा खेळाडू खेळणार आहे. त्याचा हा आयपीएलचा पहिला हंगाम असेल. २६ वर्षांचा नॉर्के गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार होता, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता.

दिल्ली कॅपिटल्सने निवडल्यानंतर एन्रिक नॉर्के म्हणाला की, दिल्ली संघात सामील होण्यास मी खूप उत्साही आहे. ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळल्याने मला मोठा अनुभव मिळेल यात शंका नाही. या वेगवान गोलंदाजाने मागील वर्षी भारताविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी ६ कसोटी सामन्यांत ३५.११ च्या सरासरीने १९ बळी घेतले आहेत. ७ वनडे सामन्यात २०.२१ च्या सरासरीने १४ बळी घेतले आहेत. ३ टी-ट्वेंटी सामन्यांत ४८.५ च्या सरासरीने २ विकेटस् त्याच्या नावावर आहेत. त्याला २०२० साठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ‘सर्वोत्तम नवोदित खेळाडू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत दिल्ली संघात कागिसो रबाडाही असेल.

दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आहे. यासह या संघाच्या कर्णधारपदाची धुरा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर वाहत आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या लिलावात ख्रिस वोक्सला दिल्ली कॅपिटल्सने १.५ कोटीत खरेदी केले होते.

दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू ः श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, किमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्‍विन, ऋषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय, एन्रिक नॉर्के, आलेक्स केरी, शिमरॉन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कुस स्टोईनिस आणि ललित यादव.