दिल्लीहून मडगावी रेल्वेने येणार्‍यांची मडगावातच होणार कोरोना चाचणी

0
133

 

>> चाचणीसाठी परप्रांतीयांना २ हजार रु. ः गोमंतकीयांना निःशुल्क

शुक्रवारपासून नवी दिल्लीतून गोव्यात येणारी ‘राजधानी एक्सप्रेस’ ही गाडी फक्त मडगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची मडगाव येथे कोरोना चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना १४ दिवस सामाजिक विलगीकरणात रहावे लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

‘राजधानी एक्सप्रेस’ रेल्वेगाडीतून गोव्यात येणार असलेल्या बिगर गोमंतकीयांना कोरोना चाचणीसाठी २ हजार रु. भरावे लागतील. तर गोमंतकीयांची चाचणी मोफत केली जाणार आहे. पहिल्या रेल्वे गाडीतून गोव्यात येण्यासाठी ५०० लोकांनी बुकिंग केले असल्याची माहिती सावंत यांनी दिली. त्यात ४०० गोमंतकीय असतील. कोरोना चाचणीनंतर जे गोमंतकीय असतील त्यांना १४ दिवस आपल्या घरी सामाजिक विलगीकरणात रहावे लागणार आहे. तर जे बिगर गोमंतकीय असतील व ज्यांनी येथे रहायची सोय नसेल त्यांना सरकारने विलगीकरणात ठेवण्यासाठी जेथे सोय केलेली असेल अशा ठिकाणी १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

१५ मे रोजी राजधानी एक्सप्रेसची पहिली गाडी गोव्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
जे लोक गोव्यात पर्यटक म्हणून येऊ पाहत आहेत व ज्यांची येथे रहायची सोय नाही अशा पर्यटकांनी सध्या तरी गोव्यात न येणेच शहापणाचे ठरणार असल्याचे सावंत म्हणाले.

मार्गदर्शक तत्वे १८ नंतरच
आंतरराज्य मार्गावरुन ज्या रेल्वेगाड्या व अन्य वाहतूक सुरु होणार आहे व या गाड्यांतून जे लोक वेगवेगळ्या राज्यांत जाणार आहेत. त्यांच्यासाठीचे मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृहमंत्रालय १८ मे रोजी ठरवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.