दिल्लीमधील फूल बाजारात बॉम्बस्फोटाचा कट उधळला

0
17

>> बॅगेत आढळले तीन किलो आरडीएक्स

दिल्लीतील गाझीपूर फुल बाजारात एका स्कूटरवर ठेवलेल्या बॅगमध्ये आयईडी बॉम्ब आढळून आला. वेळीच हा बॉम्ब निकामी करण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून याप्रकरणी दिल्ली पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.

गाझीपूर फुल बाजार येथे एक बेवारस बॅग असल्याची माहिती अकराच्या सुमारास प्राप्त झाली होती. एका स्कूटीवर ही बॅग ठेवण्यात आली होती. याबाबत संशय आल्याने स्थानिक दुकानदाराने पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने तिथे धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले.

बाजाराच्या पहिल्या गेटवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. ज्या ठिकाणी हा बॉम्ब ठेवण्यात आला होता तेखील मुख्यद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे. परंतु कॅमेराचा फोकस स्पॉटवर नव्हता. म्हणजेच बॉम्ब ठेवणार्‍या व्यक्तीने परिसराची रेकी केली होती. मात्र प्रवेशद्वारातून आत आल्यावर तिथे असलेल्या एका कॅमेर्‍यात बॉम्ब ठेवणार्‍या व्यक्तीचा चेहरा कैद झाल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी सदर बॅगमधून आयईडी बॉम्ब ताब्यात घेतल्यानंतर गाझीपूरच्या भाजी मार्केटमध्ये ८ फूटाचा खोल खड्डा खोदून त्यात बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.