दिल्लीत जीएसटीच्या बैठकीत मांडणार व्यावसायिकांच्या समस्या ः मुख्यमंत्री

0
110

केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे राज्यातील व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी राज्यातील व्यावसायिकांकडून जीएसटीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या आहे. ६ ऑक्टोबरला दिल्ली येथे होणार्‍या जीएसटी मंडळाच्या बैठकीत राज्यातील व्यावसायिकांना भेडसावणार्‍या अडचणी मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बैठकीत दिली.

जीएसटीबाबतच्या सर्व समस्या डिसेंबरपर्यत दूर करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली. जीएसटीमुळे बर्‍याच वस्तू स्वस्त होणार आहेत, असा दावा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बैठकीत केला. या नवीन करप्रणालीला व्यावसायिकांनी घाबरू नये. व्यावसायिकांना साहाय्य करण्यासाठी खास तरतूद करण्याचा विचार आहे. ३० दिवसांच्या आत परतावा देण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

राज्यातील हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर दुकानदार, वाहतूकदार, कंत्राटदार या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडल्या. सर्व सोपस्कार पूर्ण करूनही परतावा मिळत नसल्याची काहींनी तक्रार केली. सरकारी कंत्राटदारांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी वित्त सचिव दौलतराव हवालदार, दीपक बांदेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.