
उत्तर दिल्लीच्या बुरारी येथे एका घरात एकाच व्यावसायिक कुटुंबातील ११ जण संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले असून त्यात ७ महिलांचा व दोन १५ वर्षीय मुलांचा समावेश आहे. मृतावस्थेत सापडलेल्यापैकी १० जणांनी छताच्या लोखंडी गजांना गळफास लावल्याचे आढळून आले. तर एक ७७ वर्षीय वृध्द महिला घराच्या दुसर्या खोलीत जमिनीवर पडलेली आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी दूध घेऊन येणारे वाहन ७ वा. आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
गळफास लावलेल्यांचे डोळे व तोंडावर टेप व कपडा बांधण्यात आल्याचे दिसून आले. मात्र जमिनीवर पडलेल्या महिलेच्या डोळ्यांवर पट्टी नव्हती. तर मुलांचे हात व पाय बांधलेले होते असे सांगण्यात आले. पोलिसांना घरात एक चिठ्ठी सापडली.
मृतांची नावे नारायण देवी (७७), प्रतिभा (५७), भावनेश (५०), ललित भाटिया (४५), सविता (४८) व तिची तीन मुले मीनू (२३), निधी (२५ व धू्रव (१५), ललित भाटियांची पत्नी टिना (४४) व मुलगा शिवम (१५), प्रतिभा यांची मुलगी प्रियांका (३३) अशी आहेत. प्रियांकाचा यावर्षी विवाह व्हायचा होता.