नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे राज्यातील खाण अवलंबितांनी आज मंगळवार ९ ते ११ एप्रिल दरम्यान खाण बंदीच्या प्रश्नाकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी काल दिली.
सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाण प्रश्नी एक याचिका १५ एप्रिलला सुनावणीला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खाण अवलंबितांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. खाण अवलंबितांच्या एका शिष्टमंडळाने शनिवार ६ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांची भेट घेऊन राज्यातील खाण व्यवसाय बंदीच्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये राज्यातील ८८ खाणींचे लिज नूतनीकरण रद्द केल्याने राज्यात खाण व्यवसाय ठप्प झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्याने खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याय सुचविले आहेत. परंतु, गेल्या तेरा महिन्यांच्या काळात राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या पातळीवरून प्रयत्न केला जात नसल्याने खाण अवलंबितांमध्ये नाराजी पसरली आहे.
राज्यातील खाण बंदीच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये नवी दिल्लीतील रामलीला मैदान आणि जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.