महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता अजित पवार यांच्या रूपाने काल अकाली अस्ताला गेला. धावपळीच्या, दगदगीच्या ह्या क्षेत्रामध्ये विमान दुर्घटनेमध्ये अकाली मरण पावलेल्या लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये आणखी एक नाव दुर्दैवाने जोडले गेले. अजित पवार हे नावाप्रमाणेच राजकारणातले ‘दादा’ होते. त्यांचे वागणे, बोलणे, काम करणे त्याच शैलीचे होते. तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांचा मोठा भाऊ बनूनच ते वावरले, त्यांच्यासाठी शब्द टाकला, कधी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची कामे केली आणि त्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. काका शरद पवार यांच्यामुळे जरी त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला असला, तरी पवारांसारख्या उत्तुंग नेत्याच्या छायेत राहूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे काही सोपे नव्हते. किंबहुना राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केल्यानंतरही आपण बाजूला पडण्यास आपले काकाच कारणीभूत ठरत आहेत हा सल मनात ठेवून त्यांनी नंतर त्यांच्याविरुद्ध बंडही पुकारले. राजकारणात नसावा एवढा स्पष्टवक्तेपणा, रोखठोकपणा त्यांच्या ठायी होता. त्यामुळे ते आणि वाद हे समीकरण कायमच दिसे. कधी त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली, कधी कृती. सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला. परंतु राजकारणातले फासे त्यांनी असे काही फिरवले की आरोप करणाऱ्यांनाच त्यांना आपल्यासमवेत सत्तेत घ्यावे लागले. अलीकडेच त्यांच्या मुलाचे आर्थिक व्यवहार चर्चेत आले होते, परंतु एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्याचा डाग त्यांनी स्वतःवर येऊ दिला नाही. महाराष्ट्राच्या, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनातील प्रश्न त्यांना आपल्या तळहातावरच्या रेषांप्रमाणे ज्ञात होते. सिंचनापासून शेतीपर्यंतच्या विविध विषयांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळेच त्यांना प्रशासनावर जबरदस्त पकड ठेवता आली व आपला दरारा निर्माण करता आला. सतत कार्यमग्नता हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. विकासकामांच्या पाहणीसाठी पहाटे पाच वाजता फील्डवर जायची किंवा सहा वाजता बैठका लावायचीही त्यांची तयारी असे. शरद पवारांप्रमाणेच तेही वेळेचे पक्के होते. वातानुकूलीत केबीनमध्ये बसून वरून आदेश देणारा हा नेता नव्हता. तळागाळात, रस्त्यावर आणि शेताच्या बांधावर उतरून काम करणारा खरा कार्यकर्ता होता. त्यामुळेच काल अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर वज्राघात झालेले कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. ‘दादा परत या’ असा टाहो फोडत होते. सर्वसामान्यांशी अशी नाळ जोडलेला हा लोकनेता होता. फार पूर्वीपासून त्यांचा हा गुण नजरेस भरत असे. पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडच्या विकासाचे खरे शिल्पकार अजितदादाच होते. पुण्याच्या आधुनिकीकरणामध्ये दोन्ही पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. राजकारणी अनेक असतात, परंतु लोकांना सोबत नेणारे नेते कमी असतात. अजितदादांनी जे केले ते खुलेआम केले. बंडाळी केली तीही आपला सगळा सल प्रसारमाध्यमांपुढे ओकून केली. ‘आम्ही आणखी किती वर्षे वाट पाहायची?’ असा खडा सवाल टाकत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड घडवले. विकास करायचा असेल तर सत्ता हवी हे त्यांचे सरळ गणित होते. 2004 साली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेव्हा अजितदादांनी मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला द्यावे अशी मागणी केली होती. परंतु तेव्हा शरद पवारांनी तडजोड करीत अधिक मंत्रिपदे घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडून दिला होता. अजितदादा तेव्हा दुखावले गेले होते. त्यानंतर 2009 मध्ये उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचे नाव पवारांनी सुचवले. तेव्हा अजितदादा आमदारांच्या बैठकीतून चालते झाले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनवायच्या घडामोडी चालल्या होत्या, तेव्हाही अजित पवार असेच गायब झाले आणि भल्या पहाटे देवेंद्र फडणविसांसमवेत राजभवनवर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण तेव्हा साडेतीन दिवसांत राजीनामा द्यावा लागला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा बंड केले आणि राजकारणातील आधुनिक चाणक्य गणल्या जाणाऱ्या आपल्या काकांनाच धोबीपछाड दिला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत दादांच्या पत्नीचा पराभव झाला, परंतु नंतर विधानसभा निवडणुकीत 41 आमदार निवडून आणून अजितदादांनी आपले कौशल्य आणि सामर्थ्य दाखवले. वेळोवेळी उपमुख्यमंत्रिपदावर त्यांची गाडी अडली. त्यापुढे गेली नाही. त्यासाठी नशीब असावे लागते, ज्याची त्यांना साथ नसावी. कालच्या विमान दुर्घटनेने तर त्यांची जीवनरेषाच पुसली गेली. फडणवीस म्हणाले तशा ह्या ‘दिलदार, दमदार’ नेत्याचे असे अकाली जाणे दुर्दैवी आहे, शोचनीय आहे.