दिनदर्शिका

0
19

(कणचित्रं… क्षणचित्रं…)

  • प्रा. रमेश सप्रे

भिंतीवरी ही किंवा ती दिनदर्शिका असावी’- अशा जाहिरातीत दिनदर्शिकेचे उपयोग सांगितलेले असतात. तारखा, महिने तसेच तिथी-मास यांबरोबरच इतर खूप उपयुक्त माहिती त्या छोट्याशा चौकटीत असते. बुद्धिबळपटावरील चौसष्ट घरांपेक्षा दिनदर्शिकेतील एकतीस घरे सर्वांना जीवनोपयोगी असतात.

‘दिनदर्शिका’ म्हणजे? -म्हणजे मराठीत कॅलेंडर हो! खरं तर इंग्रजीत; पण कॅलेंडर म्हटलं की एकदम लक्षात येतं, हो ना? आता ही घटना पहा. काही भारतीय संस्कृतिप्रेमी मंडळींनी भारतीय दिनदर्शिका तयार करून घराघरांत वाटल्या. त्यातल्या तिथीनुसार असलेल्या दिनदर्शिकांमुळे खूप गोंधळ झाला, कारण चतुर्थीनंतर सात दिवसांनी एकादशी असं सरळ गणित तिथींचं नसतं. एक तिथी कधी दोन दिवस येते, तर कधी तिथीचा क्षय असतो. ज्या दिनदर्शिकेत चैत्र महिना- नव्हे मास- पहिल्या पानावर होता, त्यामुळे व्यवहारात गोंधळ आणखीनच वाढला. इतकंच काय पण रविवारऐवजी सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस मानून आठवडे, महिने यांची पुनर्रचना केली. तरी व्यवहारात अशा दिनदर्शिकांचा उपयोग कमी आणि गोंधळ अधिक असा अनुभव येऊ लागला. यावर उपाय काय? एक उपाय असा की, अशा प्रकारच्या दिनदर्शिका काढव्यात का? यावर पुनर्विचार केला जावा. तरीही एखादी अशी ‘भारतीय’ दिनदर्शिका घरात आलीच तर तिच्यामागचा चांगला हेतू लक्षात घेऊन ती देवघरात लावावी; इतरत्र मात्र व्यवहाराला उपयुक्त अशी सर्वमान्य दिनदर्शिका लावून उपयोगात आणावी.

एका संस्कार केंद्रात वर्षाच्या शेवटचा सप्ताह आणि नव्या वर्षाचा दिवस- 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा सप्ताह- उपासना, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास यासाठी साजरा केला जातो. एकदा उद्घाटनाला आलेल्या सद्गृहस्थांनी ‘1 जानेवारीपासून सुरू होणारं वर्ष हे भारतीय संस्कृतीचा भाग नव्हे. असं नववर्ष हा शुद्ध मूर्खपणा आहे’ अशा प्रकारचे क्रांतिकारक विचार मांडले. श्रोत्यांचा- ज्यात युवावर्ग बहुसंख्येने होता- बुद्धिभेद होऊ नये म्हणून आयोजकांनी नम्रपणे आपली भूमिका मांडली- ‘हे व्यावहारिक नववर्ष आहे. आज भारतीय मंडळी अनेक क्षेत्रांत अग्रसर बनून जग जिंकू लागलीयत. अशावेळी जागतिक वर्ष, भाषा (संस्कृती नव्हे!) यांचा स्वीकार करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्याचं, समाजाचं, जमातीचं नववर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरं केलं जातं. हा आपल्या सांस्कृतिक विविधतेचा आकर्षक पैलू आहे. ते ते दिवसही साजरे केले पाहिजेत नि केले जातातही.’ या स्पष्टीकरणानं सर्वांचं समाधान झालं. असो.

दिनदर्शिकेचा इतिहास हजारों वर्षांचा आहे. काळ (काळ म्हणजे कालमापन नव्हे) म्हणजे दिवस-सप्ताह-मास दाखवण्यासाठी दिनदर्शिका उपयोगी पडते. आपल्याकडे दिनदर्शिकेचा गौरवशाही पूर्वज म्हणजे पंचांग. तिथी-वार-नक्षत्रं-करण-योग अशी अनेक अंगे, धार्मिक मुहूर्तांसाठी पंचांग उपयुक्त असतं. ती आपली दिनदर्शिकाच आहे. फक्त दिनाचा निर्देश करून पंचांग थांबत नाही तर सूर्य-चंद्र-नक्षत्रे अशा नभांगणातील गोष्टींचा परस्पर संबंध, त्यातून निर्माण होणारे सुयोग-कुयोग यांचेही निर्देशन पंचांगात असते.

यासंदर्भात हनुमंताचा एक प्रसंग उद्बोधक आहे. भारताच्या दक्षिण टोकाला (कन्याकुमारी, रामेश्वर या ठिकाणी) जगातील एकमेव असा सागरांचा त्रिवेणी संगम आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सिंधुसागर (अरेबियन सी), पूर्वेला हेलकावणारा बंगालचा उपसागर, तर दक्षिणेला असलेला असीम हिंदी महासागर. इथे केलेले स्नान अतिपवित्र असते. कारण जगातील साऱ्या नद्या या ना त्या मार्गाने सागरालाच मिळतात. एका गावचे जोशीबुवा (म्हणजे मुहूर्त, भविष्य सांगणारे भटजी) एकदा या सागरत्रिवेणी संगमात स्नानासाठी आले होते. तेवढ्यात त्याच गावचे चौधरी त्यांना भेटले. गृहप्रवेशासाठी जवळचा मुहूर्त त्यांना हवा होता. पण जोशीबुवांकडे पंचांग नव्हते. त्याच संगमावर एक तेजस्वी वानर (हनुमान) समाधिस्थ अवस्थेत रामनाम घेत होता. त्याला मुहूर्ताबद्दल विचारलं तेव्हा हनुमान म्हणाला, ‘मला तिथी-वार-मुहूर्त काहीही लागत नाही, कारण मी अखंड रामनामात असतो, ज्याला कशाचीच आवश्यकता नसते.’ खरंय, हनुमंताला पंचांग, दिनदर्शिका कशाचीही आवश्यकता नसते.

‘भिंतीवरी ही किंवा ती दिनदर्शिका असावी’- अशा जाहिरातीत दिनदर्शिकेचे उपयोग सांगितलेले असतात. तारखा, महिने तसेच तिथी-मास यांबरोबरच इतर खूप उपयुक्त माहिती त्या छोट्याशा चौकटीत असते. बुद्धिबळपटावरील चौसष्ट घरांपेक्षा दिनदर्शिकेतील एकतीस घरं सर्वांना जीवनोपयोगी असतात.

महान व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी, जत्रा-उत्सव आदींविषयी माहिती व इतर बऱ्याच गोष्टी त्यात असतात. शिवाय या तारखांच्या मागच्या पृष्ठावर साहित्य-कला-जीवन-संस्कृती यांविषयी माहितीपर लेख असतात. यामुळे मराठीत सर्वाधिक खपाची नियतकालिकं (पिरियॉडिकल्स) या दिनदर्शिकाच ठरू लागल्यायत. पुस्तकं, दिवाळी अंक, साप्ताहिकं सारी मागं पडलीयत.

सुज्ञ मंडळी नवीन वर्षाची दिनदर्शिका हातात पडल्यावर सर्वप्रथम सर्व आप्तेष्ट, मित्रमंडळींचे वाढदिवस, सण, विशेष दिवस यांची नोंद करतात.

अनेक दिनदर्शिका आकाराने मोठ्या असतात, ज्यांचा उपयोग पूर्वी घरातील भिंतीवरील खड्डे, बिळं झाकण्यासाठी करत. आता एकाहून अधिक दिनदर्शिका भिंतींना टांगणे हे मागासलेपणाचे लक्षण समजतात. गुळगुळीत जाड अशा कागदावर छापलेल्या रंगीबेरंगी सुंदर दिनदर्शिकांची पुस्तकांना कव्हर्स घातली जातात. हस्तकलेच्या सुरेख वस्तू बनवल्या जातात. हेही नसे थोडके!

एक गमतीदार किस्सा- एक वक्ता खूप वेळ बोलला तरीही थांबत नव्हता. शेवटी थांबताना म्हणाला, ‘माफ करा. समोर घड्याळ नव्हतं म्हणून वेळ लक्षात आली नाही.’ यावर श्रोत्यांतून आवाज आला, ‘घड्याळ नव्हतं, पण कॅलेंडर होतं ना!’ बाप रे!

एका इंग्रज अधिकाऱ्याला कोणतीही जाहिरात किंवा निवेदन, घोषणा (अनाउन्समेंट) न करता एकाच वेळी लाखो लोक कुंभमेळ्यासाठी कसे जमतात याचं आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारल्यावर पं. मदनमोहन मालवीयांनी त्यांना पंचांगातील बारीक अक्षरात लिहिलेला उल्लेख दाखवला- ‘कुंभमळा पर्व, प्रयागला त्रिवेणी संगमात स्नान.’ ‘बस्‌‍ एवढंच?’ म्हणून तो अधिकारी थक्क झाला. यावर कळस म्हणजे त्यावेळी ऐंशी टक्के लोकांना वाचताही येत नव्हते. खरंच, इनक्रेडिबल इंडिया. अद्भुत भारत! आज हे सारं भिंतीवर टांगलेल्या दिनदर्शिकेतून कळतं. एका अर्थी दिनदर्शिका आहे आपली दैनंदिन मित्र-तत्त्वज्ञ नि मार्गदर्शक, फ्रेंड, फिलोसॉफर ॲण्ड गाइड! बघा विचार करून.