दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामिनास विरोध

0
88

खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) वकील जी. कीर्तनी यांनी माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना खाण घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास खास न्यायालयात सुनावणीच्या वेळी काल जोरदार विरोध केला. या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होईल.

दिगंबर कामत यांनी खाण घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील खास न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.
कामत यांच्या कार्यकाळात वरिष्ठ खाण अधिकार्‍यांनी खाण लीज नूतनीकरणाच्या विरोधात फाईल्सवर शेरे मारलेले असताना खाण लीजचे नूतनीकरण करण्यात आले आहे. खाण लीजच्या नूतनीकरणामुळे खाण मालकांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. तर सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी वरिष्ठ अधिकारी तसेच माजी खाण सचिवांनी माजी मुख्यमंत्री कामत यांच्याविरोधात जबानी दिलेली आहे. एसआयटीने सुध्दा अनेक महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी कामत यांना अटक करून चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद खास सरकारी वकील ऍड. कीर्तनी यांनी केला.
दरम्यान, कामत यांनी हेदे खाण लीज नूतनीकरण प्रकरणी दाखल केलेल्या अन्य एका अटकपूर्व जामीन अर्जावर बाजू मांडण्यासाठी एसआयटीने अवधी मागितला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर ७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

इम्रान खान जामीन
प्रकरणी युक्तिवाद पूर्ण
खाण घोटाळा प्रकरणातील संशयित व्यावसायिक इम्रान खान यांचा जामीन रद्द करण्यासाठी एसआयटीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने याचिकेवरील निवाडा राखून ठेवला आहे. खाण व्यावसायिक खान याला एसआयटीने अटक केली होती. खास न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.