- पौर्णिमा केरकर
ती थोड्याच अवधीत कामासाठी बाहेर पडली तर तिच्या वाट्याला नाही नाही ती दूषणे येतात. नवर्याचे तिला तर दुःखच झाले नाही अशी बोलणी ऐकावी लागते. एकूणच दुःखाचे प्रदर्शन मांडले की ते मोठे आहे अशी दिखाव्याची समजूत ही तर आपली परंपराच झाली आहे.
दुःखाचं प्रदर्शन मांडलं की दुःख मोठं की अगदीच छोटं आहे हे खरंच कळतं का? दुःख किती लांबीचं, त्याची रुंदी किती हे फुटपट्टी घेऊन मोजली की ते कमी होईल का? नाहीतर मग ते फुगवून दाखवायचं, त्याचा व्यास मोजायचा, ते किती काळाचं असेल याचाही परिघ ठरवून टाकायचा म्हणजे मग मनाला थोडातरी दिलासा मिळणार. पण असे करता येत नाही ना, म्हणून मग ते व्यक्त करण्यासाठी आपण किती आकांत मांडतो यावरच त्याची लांबी-रुंदी मोजली जाते. त्याची उंची व खोली मात्र मनालाच माहीत असते.
अलीकडे असण्यापेक्षा दाखवणेच जास्त जवळचे वाटत आहे. त्यामुळे दुःखाच्या आकांताला शब्द हवेतच हा अलिखित नियमच झालेला दिसतो. ‘कोरोना’च्या काळात तर कोण आपले, कोण परके हे ओळखता आले. भरल्या कुटुंबातून कर्ता पुरुष अकाली निघून गेला की त्याचा संसार उघड्यावर पडतो. त्याच्यानंतर कुटुंबाचे पोट तर भरायला हवे. लोक, शेजारीपाजारी सांत्वनाला येऊन आता पोरांचे कसे होणार? काय बाई तरी त्याच्या- म्हणजे नवर्याच्या- जीवावर गवळण कशी फिरत होती. आता तर काय संसाराची वाट लागली. पुढं कसं होणार…? त्यात जर त्या कुटुंबात मुली असतील तर त्यांचे लग्न करून टाकायचे असाही सल्ला देताना अनेकजण दिसतात. असे फुकटचे सल्ले देण्यासाठी चूरचुरे व्यक्त करण्यासाठी, सहानुभूती दाखविण्यासाठी येणारी माणसे मग एकाएकी कोठे गायब होतात कुणास ठाऊक!
सांत्वनासाठी येणारा खास वर्ग असतो. त्यांना सतत वाटत असते की दुःख हे असेच अमुक पद्धतीनेच व्यक्त व्हायला हवे. ते तसे झाले नाही तर ‘त्यांनी कोठे दुःख धरलेय कोणाचे?’ असे म्हणायला मोकळे. रोजंदारीवर पोट असलेल्या कुटुंबातील कर्ती व्यक्तीच जर काळाच्या पडद्याआड गेली तर त्याच्यानंतरच्या मोठ्या व्यक्तीने महिनोन् महिने घरातच बसून राहायचे का? त्यात ती जर छोट्या मुलांची तरुण बाई असेल तर? ती थोड्याच अवधीत कामासाठी बाहेर पडली तर तिच्या वाट्याला नाही नाही ती दूषणे येतात. नवर्याचे तिला तर दुःखच झाले नाही अशी बोलणी ऐकावी लागते. एकूणच दुःखाचे प्रदर्शन मांडले की ते मोठे आहे अशी दिखाव्याची समजूत ही तर आपली परंपराच झाली आहे.
सुविधा आणि सुविनय यांची जोडी अशीच दृष्ट लागावी अशी. जोडा असावा तर असाच…! असे बघणारे सगळेच म्हणायचे. कोणी तोंडावर तर कोणी त्यांच्या माघारी. भरल्या कुटुंबात सासू-सासरे, दिर यांच्या सहवासात आदर्श सून, कर्तव्यदक्ष गृहलक्ष्मी अशी बिरुदे लग्नानंतर तिने काही दिवसांतच सर्वांची मने जिंकून मिळविली होती. वर्षांच्या अंतराने दोन गोंडस मुलांचा जन्मही झाला. कुटुंबाचा उत्साह दुणावला. सगळं कसं सुरळीत चालू असतानाच काळाचा घाला पडला अन् कर्तासवरता मुलगाच भरल्या संसारातून उठून गेला. आता काय? जगायचं कसं? समाजात उजळ माथ्यानं कसं वावरायचं? एकटाच जीव असता तर कदाचित तो संपवूनही टाकला असता. पदरी शिक्षण कमी. मुलांना उच्च शिक्षण द्यायचं हे त्यांचं दोघांचंही स्वप्न. तो कमवायचा आणि ती घर सांभाळायची असेच आजवर चालू होते. त्याची नोकरी तशी कमी पगाराची, तरीही ती समाधानी होती. मुलंही संस्कारी. कसलीच चिंता, काळजी नव्हती… आणि हे असे अचानक सारेच उद्ध्वस्त करून टाकणारे वास्तव! कुटुंबातील ती चौघंही प्रेमाची बांधिलकी मानत होती. तो असताना त्यांचे कुटुंबीयही असेच होते. मात्र तो गेला आणि सारेच चित्र बदलले… तिच्यापुढे मुलांचे भवितव्य होते. नवर्याची नोकरी तिला मिळण्याचा प्रश्नच नव्हता. घर खेडेगावात. सांत्वनासाठी येणारेसुद्धा मनाला उभारी देणारे काही बोलत नव्हते. आता कसं होणार? इथेच चार अक्षरे मुलांना शिकवायची आणि कामाला लावायचे हेच मर्यादित विचार येता-जाता तिला ऐकू जायचे. तिला त्याची, आणि दोघांनी मिळून मुला-संसाराविषयीची स्वप्ने पूर्ण करायची होती. गावात राहून काही ते शक्य नव्हते. त्यासाठी गावातून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय तिच्याकडे होता. घरातल्यांना हे पटलं नाही. ‘आम्ही आहोत ना… तुमची मुलं ती आमचीच आहेत,’ असा दिलासा मिळाला तरी त्यात भावनेपेक्षा कर्तव्याचाच अधिक भाग होता. तिला हे सारेच जाणवत होते.
तो गेल्यावर महिनाभर कशीबशी ती घरी राहिली. घरातील सर्वांना तिनं हा निर्णय सांगितला. कोणालाही तो पटला नाही. ती तरुण, सुंदर आहे याचीही तिला सतत जाणीव करून देण्यात आली. ती ठाम राहिली. मुलांसाठी! नवर्याच्या स्वप्नपूर्तीसाठी! ती पडलीच बाहेर दृढनिश्चयाने… डबडबलेल्या डोळ्यांनी… आणि हृदयात त्या घराशी जोडलेल्या असंख्य आठवणींना सोबत घेऊन. ती शहरात येऊन स्थिरावली. ‘घरात राहूनही तुला पाहिजे ते कर!’ असा सल्लाही तिला दिला गेला. तिला माहीत होतं… तिथं आठवणी छळणार… आपण कोलमडून पडणार… येता-जाता सर्वांची सहानुभूतीची नजर तिला, तिच्या स्वप्नांना चुरगळून टाकणार… म्हणून तिने उंबरठा ओलांडला आणि तेव्हाच ती घरातल्यांना परकी झाली.
नवर्याचे तर तिला दुःखच नाही असेही बोलून झाले. शहरात गेली ती मुलांसाठी नव्हे तर तिला फिरायला मिळायला हवे म्हणून!! तिला ज्यांनी ज्यांनी आदर्श सून ठरवलेले होते, त्या सर्वांचेच हे उद्गार होते. ती स्वतः पुढे शिकली. सरकारी नोकरी मिळवली. राहणीमानात बदल केला. गाडी चालवते. मुलीला पाहिजे तसे शिक्षण दिले. मुलगा उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी करतोय. ती रडत बसली नाही, तिनं अकांडतांडवही केला नाही. आपण खूप दुःखी आहोत अशा आविर्भावात गेली नाही. आयुष्याला सोपं बनवून सहजतेनं पुढं जात मुलांना त्यांचा आनंद मिळवून देणं हेच तर त्या दोघांचं स्वप्न होतं… ते रडून नव्हे तर धीराने वास्तवाला सामोरे जात साकार होणार होते. ते तिने पूर्ण केले. समाजाला दिखावा हवाय… दुःखात चूर होऊन काहीच न करणे म्हणजे अपरिमित दुःख? की दुःखावरही मात करून पुढे जाणे योग्य? ही आपली वेदना मुलांनी का भोगावी, त्यांना त्यांचे-त्यांचे आयुष्य जगू द्या की असा विचार करून तो कृतीत आणणे योग्य? आणि दुःखाला, वेदनेलाही ठणकावून सांगणे, तू मला उद्ध्वस्त केलंस तरीही बेहत्तर… या दुःखानेच तर मला जगणं शिकवलं असं मानून वेदनेलाच सजवायला गेलेली ती आतून आतून त्याच्यासाठीच तर जगली!