दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ

0
98

सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ जाहीर झाला असून त्यांच्याबरोबरच सुप्रसिद्ध आसामी कवी नीलमणी फुकन यांचीही यावर्षी ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोकणी भाषेतील साहित्यिकाला मिळालेला हा दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार असून यापूर्वी कोकणीतील अन्य एक साहित्यिक रवींद्र केळेकर यांना २००६ साली हा पुरस्कार प्राप्त झाला होता.

दामोदर मावजो हे कोकणी साहित्य विश्‍वात एक कथाकार व कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय एक समीक्षक व पटकथाकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. ‘कार्मेलिन’ ह्या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या व अश्‍लिलतेचे आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या कादंबरीला १९८३ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. २०११ साली त्यांच्या ‘त्सुनामी सायमन’ ह्या कादंबरीला विमला पै कोकणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता.
मावजो यांनी आतापर्यंत विपुल असे साहित्य लेखन केलेले असून त्यात दोन कादंबर्‍या, चार कथासंग्रह तसेच युवा वर्गासाठी लिहिलेल्या अन्य तीन पुस्तकांचाही समावेश आहे.

मावजो यांची ‘कार्मेलीन’ ही कादंबरी अत्यंत गाजली असून तिचे डझनभर भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. मावजो यांच्या कथांचाही विविध देशी भाषांमध्ये तसेच इंग्रजीमधूनही अनुवाद झालेला आहे.
प्रागतिक विचारधारा असलेले साहित्यिक अशीही मावजो यांची ओळख आहे. धर्मांध विचारसरणी घेऊन पुढे जाऊ पाहणार्‍या लोकांवर त्यांनी टीका केल्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षणही पुरवावे लागले होते. गौरी लंकेश ह्या महिला पत्रकाराच्या हत्येचा तपास करणार्‍या पोलिसांना मावजो यांचेही नाव ह्या हल्लेखोरांच्या हिटलिस्टवर असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या घरी त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते.

‘तेरेजास मेन ऍण्ड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा’ ह्या इंग्रजी भाषेतून अनुवादित झालेल्या त्यांच्या कथासंग्रहासाठी त्यांचे २०१५ साली फ्रँक ओ कोन्नोर पुरस्कारसाठी नामांकन झाले होते. त्यामुळे एक साहित्यिक म्हणून त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोचले होते.
१९७५ साली त्यांची ‘सूड’ ही कादंबरी प्रसिध्द झाली. त्यानंतर १९८१ साली कार्मेलिन, २००९ साली त्सुनामी सायमन व २०२० साली ‘जीव दिंव काय च्या मारु ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. गांथन, जागरणां, रुमडफूल, भुरगीं म्हगेली ती, सपनमोगीं, तिष्टावणी हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत.

मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याचे वृत्त काल समजताच राज्यभरातील साहित्यिकांनी त्यांचे प्रत्यक्ष घरी जाऊन तसेच दूरध्वनी तसेच समाज माध्यमावरून अभिनंदन केले.

दामोदर मावजो यांची साहित्यसंपदा

जन्म ः १ ऑगस्ट १९४४,
माजोर्डा (सालसेत)
कादंबर्‍या ः
• १९७५ – सूड
• १९८१ – कार्मेलीन
• २००९ – सुनामी सायमन
• २०२० – जीव दिंव काय च्या मारूं
कथासंग्रह ः
• १९७१ – गांथन
• १९७५ – जागरणां
• १९८१ – रुमडफूल
• २००१ – भुरगी म्हगेली ती
• २०१४ – सपनमोगी
• २०२० – तिश्टावणी
महत्त्वाचे पुरस्कार ः
• १९८३ साली कार्मेलीन कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.
• १९८५ साली अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.