भाजपची आयात

0
30

आगामी विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता टिकवण्याचे फार मोठे आव्हान समोर असलेल्या भारतीय जनता पक्षाने काल कॉंग्रेसचा एक बडा मासा रवी नाईक यांच्या रूपाने गळाला लावला. अर्थात, हे अनपेक्षित नव्हते, कारण गेल्या वर्षीच रवींचे दोन्ही पुत्र भाजपवासी झाले होते आणि स्वतः रवींनीही कॉंग्रेस नेतृत्वापासून गेला बराच काळ फारकत घेतलेली दिसून येत होती. त्यामुळे हा भाजप प्रवेशाचा सोपस्कार फक्त बाकी होता असेच म्हणावे लागेल. कॉंग्रेसच्या उरल्यासुरल्या आमदारांपैकी आणखी एकाला गळाला लावण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न चालला आहे.
स्वतःचे आमदार पुन्हा निवडून येण्याच्या शक्यता जसजशा धूसर व्हायला लागल्या, तसतसे विरोधकांमधून आयते उमेदवार गोळा करण्यामागे भाजप नेतृत्व लागल्याचे दिसू लागले. मतदारसंघात पुरेसा प्रभाव असलेले आणि स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकतील असे नेते जवळ करून आपले घसरणारे संख्याबळ वाढविण्याची ही केविलवाणी धडपड आहे. याचा परिणाम म्हणून स्थानिक निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात आहेत, अश्रू ढाळत आहेत, परंतु त्याची तमा बाळगण्यास भाजपा श्रेष्ठींना आज वेळ नाही अशी स्थिती आहे. काहीही करून पुन्हा सत्ता हस्तगत करायची यासाठी चाललेला हा तत्त्वशून्य आटापिटा आहे.
येत्या निवडणुकीत विरोधक वेगवेगळे लढतील आणि त्याचा फायदा मतविभाजनात होऊन भाजप आरामात जिंकेल असे बाळबोध गणित मांडणार्‍यांना विरोधकांच्या एकत्रीकरणाने हादरे द्यायला सुरूवात केली आहे. जो मगो पक्ष जवळ येण्याची आशा भाजपने बाळगली होती, तो तृणमूल कॉंग्रेससारख्या विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाला जवळ करायला तयार झाला आहे, परंतु भाजपाला दूर ठेवतो आहे. गोवा फॉरवर्डने कॉंग्रेस फार भाव खात असूनही युतीसाठी त्याचीच मनधरणी चालवलेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची कॉंग्रेसशी युती झाल्यात जमा आहे. विरोधकांच्या एकजुटीच्या अशा प्रयत्नांमुळे भाजपला आपले मिशन २२ पूर्ण करणेही किती अवघड आहे याची जाणीव झाली यात नवल नाही. त्यामुळेच जयेश साळगावकर, रवी नाईक, गोविंद गावडे अशी नवी मंडळी पक्षात डेरेदाखल करून का होईना, पण सरतेशेवटी विजयी संख्याबळ वाढवण्याचा हा सारा आटापिटा चाललेला आहे. विशेष म्हणजे गोव्याच्या राजकारणात जो तो विकाऊच असल्याने वाट्टेल तशा तडजोडी करण्यात कोणालाही काही वावगे वाटेनासे झालेले आहे हेही तितकेच खरे.
रवी नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रभावशाली नेते. दोनवेळा गोव्याचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषविले. यापैकी एकदा ९४ साली राज्यपाल भानुप्रकाश सिंहांच्या कृपेने ते मुख्यमंत्री झाले खरे, परंतु अवघ्या सहा दिवसांत सत्तेवरून पायउतार होत औटघटकेचे मुख्यमंत्री बनण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेलेला आहे. रवींचा हा भाजप प्रवेश काही पहिल्यांदा होत नाही. यापूर्वी २००० सालीही त्यांनी असाच भाजपात प्रवेश केला होता तो इतिहासही थोडा आठवावा लागेल.
ज्यांना आता आग्रहपूर्वक पक्षात घेतले त्याच रवी नाईकांच्या विरुद्ध भाजपने केवढे मोठे रान पेटवले होते. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर अटालाची मैत्रीण लकी फार्महाऊसच्या मुलाखतीतील ‘रॉय’ म्हणजे रवी नाईक यांचाच पुत्र असल्याचे सुचविणारी प्रचंड हाकाटी तेव्हा भाजप नेत्यांनी चालवली होती. परंतु हेच रॉय भाजपवासी होताच सगळे चिडीचूप झाले. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो तो हा असा.
रवींच्या भाजप प्रवेशाचा भाजपला फायदा काय? निश्‍चितच आहे, कारण रवी हे भंडारी समाजाचे खंदे नेते आहेत. आम आदमी पक्षाने भंडारी मुख्यमंत्री करण्याची घोषणा करून अडचणीत आणलेल्या भाजपला राज्यात तीस टक्के लोकसंख्या असलेल्या ह्या सर्वांत मोठ्या समाजाला आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आत्यंतिक गरजेचे ठरले होते. त्यामुळेच भंडारी कार्ड वापरण्याचा हा निर्वाणीचा प्रयत्न भाजपाने चालवलेला आहे. रवींसारख्या दोनदा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ नेत्याला निवडून आल्यास केवळ मंत्रिपदावर समाधानी ठेवता येणार आहे का? परंतु पुढचे पुढे पाहू. सध्याच्या निवडणुकीत रवींचा हा पक्षप्रवेश सर्व दृष्टींनी लाभदायक ठरणार आहे, निदान त्यात नुकसानकारक असे तरी काही नाही असा सोईस्कर विचार यामागे आहे. सद्यपरिस्थितीत ‘विनेबिलिटी’ लक्षात घेता रवींसारख्या रेसच्या हुकुमी घोड्यांची भाजपला नितांत गरज आहे. सुदिन ढवळीकरांविरुद्धही हे ब्रह्मास्त्र भाजपच्या नक्कीच कामी येऊ शकेल!