राजभाषा कायद्यातून मराठीला वगळण्याची केली होती कायदा दुरुस्तीची मागणी; मराठीप्रेमींकडून विधानाचा निषेध
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केले असून, त्यांच्या वक्तव्यावर मराठीप्रेमींनी तीव संताप व्यक्त केला आहे. गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको आणि सरकारी कामकाज, कायदे, अधिसूचना फक्त कोकणीतून प्रसिद्ध कराव्यात, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, असे विधान दामोदर मावजो यांनी केल्याने मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हल्लीच मुख्यमंत्र्यांनी एका कोकणी कार्यशाळेत बोलताना कोकणी व मराठीतून आलेल्या पत्रांना त्याच भाषेतून उत्तर दिले जाईल, असे सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दामोदर मावजो यांनी राजभाषा कायद्यातूनच मराठीला वगळा, अशी मागणी केली. भले पत्रांना मराठीतून उत्तर द्या; पण कायद्यात फक्त कोकणी भाषेचा समावेश असावा, मराठीचा नको, अशी भूमिका मावजो यांनी व्यक्त केली होती. या विधानावर आता मराठीप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे.
मावजोंचे विधान आक्षेपार्ह : ॲड. खलप
मराठी आणि कोकणी या भाषा भगिनींना राजभाषा कायद्यांतर्गत शासकीय व्यवहारात समान दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दामोदर मावजो यांचे हे विधान आक्षेपार्ह आहे, असे माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.
…हा तर कृतघ्नपणा : आमोणकर
गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी मावजो यांचा कडक शब्दात निषेध केला आहे. स्वतः मराठी शिकून, मराठी वाचून साहित्यिक म्हणून लौकिक प्राप्त केलेले मावजो हे मराठीचे कायद्याने असलेले स्थान नाकारतात हा कृतघ्नपणा आहे. आताच विधानसभेत कुठली मराठी? म्हणणाऱ्या आमदाराला मराठीप्रेमींनी माफी मागायला भाग पाडले, याची आठवण मावजो यांनी ठेवावी, असे आमोणकर यांनी म्हटले आहे.
गो. रा. ढवळीकर यांची मावजोंवर टीका
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेल्या दामोदर मावजोंसारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवर यायला नको होते. एका दृष्टीने मावजोंनी राजभाषा कायदा दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला हे बरेच झाले; कारण गोमंतकीय मराठी भाषिकांना त्यात दुरुस्ती हवीच आहे आणि दुसऱ्या बाजूने रोमी समर्थक कॅथोलिक बांधवांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी मराठी आणि रोमी कोकणी यांनाच राजभाषेचे स्थान देणारे विधेयक संमत करावे, अशी मागणी मराठी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते गो. रा. ढवळीकर यांनी केली आहे.
मराठी इथे उपरी नाही : मोये
मराठी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भाई मोये यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मराठी इथे उपरी नाही. तिचे स्थान अढळ आहे. कोकणीप्रेमींना प्रसिध्दी ही गोव्यातील मराठी वृत्तपत्रांमुळेच मिळते. आता मराठीवरील अन्याय सहन केला जाणार नाही.
म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक व मराठी चळवळीतील कार्यकर्ते तुषार टोपले यांनीही मावजो यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. मावजोंनी विनाकारण मराठीचे स्थान नाकारून मराठीप्रेमींना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. मराठीप्रेमी गप्प बसणार नाहीत, असे टोपले यांनी म्हटले आहे.
मराठीप्रेमींकडून आज म्हापशात निषेध
राजभाषा कायद्यात मराठीला स्थान नको, असे आक्षेपार्ह विधान दामोदर मावजो यांनी केल्याबद्दल त्यांचा शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठीप्रेमींकडून जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मराठीप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक ॲड. महेश राणे व माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी केले आहे.
ज्यांना मराठी साहित्य संमेलनात दिले मानाचे स्थान, त्यांच्याकडून मराठीचा अवमान : डॉ. विद्या प्रभुदेसाई
संतांच्या मराठी संस्कारात पोषण झालेल्या मराठी भाषिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्यांना सन्मानपूर्वक स्थान दिले, त्यांनीच राजभाषा कायद्यात दुरुस्ती करुन मराठीचे सहभाषेचे म्हणून असलेले स्थानही रद्द करण्याची मागणी करावी ही गोष्ट निषेधार्हच नाही, तर अत्यंत धक्कादायक आहे. आठव्या परिशिष्टात सामील झालेली कोकणी भाषा पदावर पोहचून तिच्या मस्तकी राजभाषेचा मुकुट चढला ही गोष्ट कोणत्याही कोकणी माणसाला कितीही आनंद देणारी वाटली तरी त्याच्यामागे असलेली शेकडो वर्षांची मराठी परंपरा आणि तिचे मौलिक स्थान अमान्यच नाही, तर तिचे उच्चाटन व्हावे याचा आग्रह धरणारी मानसिकता मात्र हिणकस आहे, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिका तथा समीक्षक डॉ. विद्या प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे.