दाभाळ नदीत विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

0
25

>> एका विद्यार्थ्याला अत्यवस्थ स्थितीत दाखल केले बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात

सुट्टी असल्याने सहलीसाठी दाभाळ भागात नदीकिनारी आलेल्या ९ विद्यार्थ्यांच्या गटातील एकजण बुडाल्याची घटना काल दुपारी घडली. पाण्यात गटांगळ्या खाल्लेल्या दुसर्‍या एका विद्यार्थ्याला अत्यवस्थ स्थितीत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. बुडालेल्या योगानंदचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

योगानंद गावडे (वय २१, रा. बेतोडा) असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने अत्यवस्थ स्थितीत संतोष देसाई (वय २०, रा. वास्को) याला बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने बेतोडा येथील योगानंद गावडे यानेच ही सहल आयोजित केली होती, असे सांगण्यात आले असून, या सहलीत एकूण नऊजण सहभागी झाले होते.

सकाळी हा गट कोडार नदीवर पोचला होता; परंतु त्या ठिकाणी पाणी जास्त नसल्याने ते दाभाळ येथे नदीवर गेले होते. जेवणाची तयारी करीत असतानाच योगानंद व संतोष पाण्यात उतरले. योगानंद हा पोहण्यात तरबेज होता, तर संतोषला पोहायला येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या नादात योगानंद खोल पाण्यात पोचला. यावेळी प्रणय व इतरांनी संतोषला वाचवले, पण योगानंद बुडाला. संतोष अत्यवस्थ स्थितीत असल्याने त्याला त्वरित वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले.या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवल्यानंतर कुडचडे अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बुडालेल्या दुर्दैवी योगानंद गावडे याचा शोध घेतला. त्यानंतर उशिरा योगानंदचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, पंच सदस्य रमाकांत गावकर, भोला गावकर, आनंद गावकर आणि नऊ जणांच्या गटातील प्रणय याने बचाव कार्य केल्याने एकाचा जीव वाचला.

पंच सदस्य रमाकांत गावकर यांची तत्परता

कोडली-दाभाळ पंचायतीचे पंच सदस्य रमाकांत गावकर हे ही घटना घडली, त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी मदतकार्यासाठी तात्काळ ते धावून गेले. माजी सरपंच भोला गावकर व आनंद गावकर यांनीही मदत कार्यात भाग घेतला व अत्यवस्थ स्थितीतील संतोष देसाईला पिरये आरोग्य केंद्रात दाखल केले