दाबोळी विमानतळ कायम ठेवण्यास कटिबद्ध

0
8

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची विधानसभेत ग्वाही

विरोधकांची दाबोळीच्या अस्तित्वाबाबत चिंता

राज्य सरकार दाबोळी विमानतळ कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. गोव्यात आगामी काळात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. दाबोळी विमानतळाला काही मर्यादा आहेत. तरीही, हा विमानतळ बंद करण्यासाठी मान्यता दिली जाणार नाही.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून दाबोळीवरील आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोप विमानतळावर वळविण्यास मान्यता न देण्याची विनंती केली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिली. तर, सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे दाबोळी विमानतळाचा मुद्दा मांडला. दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोप विमानतळावर वळविण्यास सुरुवात केल्याने विशेषतः दक्षिण गोव्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले. चर्चेच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाचा मुद्दा लावून धरला.

दोन्ही विमानतळ कार्यरत ः मुख्यमंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळाने गोव्यातील दोन्ही विमानतळ सुरू ठेवण्याचा ठराव संमत केलेला आहे. त्यामुळे एका कंपनीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोपवरून सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. राज्य सरकार दोन्ही विमानतळ कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दाबोळी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवा सुरूच राहणार आहे. त्यांना मोपवर वळविण्यास मान्यता दिली जाणार नाही. नवीन विमानसेवा मोपवरून सुरू केल्या जाऊ शकतात., दाबोळी विमानतळाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री व इतर मंत्र्यांची भेट घेऊन दाबोळी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी ग्वाही यावेळी मुक्यंत्र्यांनी दिली.

मोपवर सनबर्नला मान्यता नाही
मोप येथे सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. सनबर्न हा खासगी संस्थेकडून आयोजित केला जातो. राज्य सरकार केवळ परवानगी देण्याचे काम करते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

दाबोळीतील विमानांच्या उड्डाणांची संख्या कमी
एअर इंडिया कंपनीने 21 जुलैपासून दाबोळीवरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करून मोपा विमानतळावरून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी काही विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोपावरून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.

दाबोळी विमानतळावरील विमानांचा आकडा कमी होत चालला आहे. तर, दुसरीकडे मोपावरील विमानांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ बंद पडण्याचा धोका आहे. जीएमआर कंपनी दाबोळी बंद करण्यासाठी दबाव आणत आहे, असा आरोप आमदार आलेक्स यांनी केला.
केंद्र आणि राज्य सरकारकडून दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे. तथापि, दाबोळीवरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोपावर वळविण्यास सुरूवात झाल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

दाबोळी विमानतळ बंद करण्यासाठी पद्धतशीपणे काम सुरू आहे. वर्ष 2022 मध्ये दाबोळीवर 334 चार्टर्ड विमाने आली होती. तर, वर्ष 2023 मध्ये 154 चार्टर्ड विमाने आली आहेत. इंडिगो, विस्तारासारख्या अनेक विमान कंपन्यांनी दाबोळीवरून सेवा बंद करण्यास सुरूवात केली आहे, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
गोव्यात दोन विमानतळ व्यवहार्य नाहीत, असा एक अहवाल आहे. त्यामुळे दाबोळीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यंदा सनबर्न संगीत महोत्सव मोप येथे होण्याची शक्यता आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. आमदार कृष्णा साळकर, आमदार कार्लुस फेरेरा आदींनी चर्चेत भाग घेतला.