दाबोळी विमानतळावर बॉम्बठेवल्याच्या ईमेलने धावपळ

0
8

दाबोळी विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने दाबोळी विमानतळ प्राधिकरणाची एकच धावपळ उडाली. दाबोळी विमानतळावर सुरक्षा हाय अलर्ट करण्यात आली आहे.
काल सोमवारी सकाळी दाबोळी विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा ईमेल दाबोळी विमानतळ प्राधिकरणाला मिळाला. ज्यात दावा केला होता की परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने वास्को पोलीस विभाग, सीआयएसएफ, एटीएस, अग्निशमन दल आणि इतर एजन्सीच्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी श्वानपथकासह कसून शोध घेतला. बॉम्ब निकामी पथकाने परिसराची कसून झडती घेतली. मात्र या शोधकार्यात कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी फसवणुकीच्या स्त्रोताची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे देशव्यापी सुरक्षा तपासणी सुरू झाली.

विमानतळ संचालक एस. व्ही. टी. धनंजय राव यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यालयाला सकाळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर आम्ही आता अतिरिक्त खबरदारी घेत आहोत. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गोवा पोलिसांना विमानतळ प्राधिकरणाने याबाबत अधिकृत तक्रारीद्वारे सूचित केले होते.