दाबोळी विमानतळावर कोरोना चाचणीची सोय करा : चोडणकर

0
41

गोव्यातून विदेशात जाणार्‍या गोमंतकीयांच्या सोयीसाठी दाबोळी विमानतळावर रॅपिड अँटिजेन चाचणीची सोय केली जावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केलीे.

परदेशात जाणार्‍या देशातील नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले, तरी त्यांच्याकडून रॅपिड अँटिजेन चाचणी अहवालाची मागणी केली जाते. गोव्यातून जाणार्‍या प्रवाशांसाठी दाबोळी विमानतळावर रॅपिड अँटिजेन चाचणीची सोय नसल्याने एअर अरेबियाने दाबोळी विमानतळावरून आपली विमान सेवा बंद केली आहे. त्यामुळे तिकिटांचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना सदर तिकिटे रद्द करून मुंबईहून जाणार्‍या विमानांची तिकिटे नव्याने काढावी लागत आहे; मात्र त्यासाठी पूर्वी बुकिंग केलेल्या तिकिटांचे पैसे मिळत नसल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच विमानाची तिकिटे शेवटच्या क्षणी काढावी लागत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत असल्याचे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

गोमंतकीयांवर नोकर्‍या किंवा पैसे गमावून बसण्याची पाळी येऊ नये, यासाठी दाबोळी विमानतळावर रॅपिड अँटिजेन चाचणीची सोय केली जावी. तसेच जास्त पैसे घेऊन लुबाडणूक केली जाऊ नये, यासाठी चाचणी करण्यास एकापेक्षा जास्त प्रयोगशाळांकडे जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.