>> केंद्रीय मंत्री विजयकुमार सिंह यांची ग्वाही
>> आशिया पॅसिफिक परिषदेचे उद्घाटन
गोव्यातील नवीन मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही. दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार असून दोन्हीपैकी कुठलाही विमानतळ नुकसानीत येऊ नये म्हणून आवश्यक व्यवस्थापन केले जाणार आहे. अतिरिक्त विमान वाहतूक मोप विमानतळाकडे वळविण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री विजयकुमार सिंह यांनी आशिया पॅसिफिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना काल केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो, मंत्री रोहन खंवटे यांची उपस्थिती होती.
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीसाठी बंद केला जाणार असल्याची चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या जून २०१० मध्ये घेतलेल्या बैठकीत दाबोळी आणि मोप दोन्ही विमानतळ चालू ठेवण्याच्या ठराव संमत करण्यात आलेला आहे. या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन मोप विमानतळाला अधिक कनेक्टिव्हिटी दिली जाणार असून अतिरिक्त वाहतूक मोपकडे वळविण्यात येणार आहे, असे यावेळी केंद्रीय मंत्री सिंह यांनी सांगितले.
कोविड महामारीनंतर भारतातील विमान वाहतुकीत सुधारणा होत आहे. सुमारे ९५ टक्के विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. देश आंतरराष्ट्रीय वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री विजयकुमार सिंह यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये मोपचे उद्घाटन ः मुख्यमंत्री
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. विमानतळ संबंधीच्या बैठकीमध्ये उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कॅन्सो आशिया पॅसिफिक परिषद गोव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. गोवा राज्य नागरी विमान वाहतुकीच्या नव्या युगात प्रवेश करणार आहे. विमानतळ हे आर्थिक विकासाचे प्रवेशद्वार आहे. राज्यातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीसाठी प्रभावीपणे काम केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दाबोळीबाबत नागरिकांची दिशाभूल ः माविन
मुरगाव तालुक्यातील मंत्री, दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री व्ही. के. सिंह यांची भेट घेऊन दाबोली विमानतळाच्या विषयावर चर्चा केली. केंद्रीय मंत्री सिंह यांनी गोव्यातील दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दाबोळी विमानतळाबाबत काहीजणांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री सिंह यांच्या स्पष्टीकरणामुळे नागरिकांतील संशयाचे वातावरण दूर होण्यास मदत होणार आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.