दाबोळीतील विमानसेवा दाट धुक्यामुळे कोलमडली

0
99

>> अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

>> हवामान दोन दिवस कोरडे राहण्याची शक्यता

काल पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम दाबोळी विमानतळावरील विमानसेवेवर झाला. पहाटे आलेली चार विमाने न उतरताच दुसरीकरडे वळविण्यात आली. सकाळी ८.३० नंतर वातावरणात बदल झाल्यानंतर दाबोळी विमानतळावर विमाने उतरविण्यात आली. दरम्यान, लक्षद्वीप, उत्तर गुजरात आणि महाराष्ट्रातील समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील हवामानात बदल झाला असून हवामान पुढील दोन दिवस कोरडे राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल पहाटे पडलेल्या दाट धुक्याचा फटका दाबोळी विमानतळावर उतरणार्‍या देशविदेशी विमानाना बसला. त्यामुळे इंडिगो ६ ई १२८ हे चेन्नईहून गोव्यात दाबोळी विमानतळावर आलेले विमान दाट धुक्यामुळे न उतरवताच बंगळुरूला वळविण्यात आले. तसेच रॉयल फ्लाईट एबीजी ८६३१ हे रशियाहून आलेले विदेशी विमानही बंगळुरूला वळविणे भाग पडले. या व्यतिरिक्त गो एअर जी ८५७५ हे मुंबईहून आलेले विमान तसेच तुई एअर टीओएम १५२ हे मॅन्चेस्टरहून गोव्यात आलेले विमान दाट धुक्यामुळे मुंबईला वळविण्यात आले. त्यामुळे या विमानातून आलेल्या प्रवाशांना याचा फटका बसला. तसेच दाबोळी विमानतळावर या प्रवाशांना नेण्यास आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना तसेच इतरांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

सकाळी ८.३० नंतर वातावरणात सुधारणा झाल्यानंतर ७ विमाने दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आली तसेच ५ विमानांनी उड्डाण केले. वळविण्यात आलेली विमाने नंतर उशिरा दाखल झाली. दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी एअर एशिया १३२४ व एअर एशिया ७७७ सकाळी ७.३० वा. उतरणारी विमाने बंगळुरूला वळविण्यात आली होती.

हवामान दोन दिवस
कोरडे राहण्याची शक्यता
लक्षद्वीप, उत्तर गुजरात आणि महाराष्ट्रातील समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील हवामानात बदल झाला असून हवामान कोरडे बनले आहे. बदललेल्या हवामानामुळे काल सकाळी राजधानी पणजीसह अनेक भाग दाट धुक्यात हरवले होते. आगामी दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. काल सकाळी आठ ते साडे आठ वाजेपर्यंत दाट धुक्याचा प्रभाव होता. या धुक्यामुळे विमानसेवा, जलसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. वाहन चालकांनासुद्धा वाहने चालविताना दाट धुक्यामुळे त्रास सहन करावे लागले. अफगाणिस्तान आणि शेजारी भागातील वादळी वातावरणामुळे एकंदर हवामानात बदल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मागील चोवीस तासात कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. आगामी चोवीस तासात सकाळच्या वेळी धुक्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच तापमान ३४ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. थंडी, ताप, खोकला सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.