- शरत्चंद्र देशप्रभू
दादांविषयी सगळ्यांनाच आदरभाव. मधुर वाणी हा त्यांचा स्थायिभाव. यामुळे त्यांना विविध पेश्यातील, विविध स्तरांतील व्यक्ती वश होत. सरंजामशाहीच्या काळात पण दादांनी कधी भेदभाव केल्याचे उदाहरण नाही.
लहानपणी आम्हा मुलांवर घरातील एका व्यक्तीने गारुड केलं होतं. यांच्या सान्निध्यात आम्हा मुलांना आश्वासक वातावरणाचा परिघ लाभत होता. यांच्या गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे आम्हाला तहानभुकेची पण जाणीव होत नसे. एखादी ऐतिहासिक घटना; किंवा घटना प्रासंगिक असली तरी खुलवून सांगण्याचे यांचे कसब मंत्रमुग्ध करणारे. अंतर ठेवून, आब राखून पण आम्हा मुलांत समरस होण्याची यांची हातोटी वाखाणण्याजोगी! ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून कै. दत्ताराम देशप्रभू ऊर्फ दादा.
यांच्या व्यक्तिमत्त्वाने आम्ही लहानपणी भारून गेलो. तरुणपणी पण यांचे निधन होईपर्यंत यांचा प्रभाव आमच्या मनावर कायमचा ठसा ठेवून गेला. ऐकिव माहितीप्रमाणे यांनी प्रो. राममूर्ती यांच्याकडून पैलवानीचे प्रशिक्षण घेतले. हौशी पैलवान या नात्याने कुस्त्या पण गाजविल्या असे ऐकून होतो. परंतु यांनी केलेला लिंबूकाप प्रयोग पाहिलेले साक्षीदार हयात होते. शिवाय कमावलेल्या बलदंड शरीरावर पाषाण फोडून घेण्याचे प्रयोग पण लोकांनी पाहिले. परंतु आमच्यासाठी हा इतिहासच होता. कारण आमच्या आठवणीतले ‘दादा’ प्रौढ वयातील. परंतु शरीराचे गतवैभव दादांना पाहिल्यावर प्रतीत होत होते. ‘बेबंदशाही’ किंवा ‘आग्र्याहून’ सुटका या ऐतिहासिक नाटकांतील खटकेबाज संवाद ऐकावे ते कै. दादांच्या मुखाने. खास करून शिवाजी महाराज अन् मिर्झाराजे यांच्यातील भेटीदरम्यानचे नाटकातील संवाद ऐकवून कै. दादा एकपात्री प्रयोग करतच, परंतु तो इतिहासकालीन प्रसंग आमच्यासमोर अक्षरशः जिवंत करीत. शिगमोत्सवातील तसेच मठासमोर रामनवमीनिमित्त होणार्या नाटकांचे पण दादांना आकर्षण. त्यांच्याकडून स्थानिक कलाकारांची अमूल्य माहिती पण आम्हाला मिळत असे. कलावंतांची व्यंगे रंगभूमीवर ते नेमकेपणे हुडकून काढत. स्टेजवर उभे राहण्याची ढब, चालण्याची स्टाईल, संवादफेक, गायकी याबद्दल त्यांना जाणकारी होती. यामुळेच हौशी रंगभूमीवरचे किस्से त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे एक बहारदार मेजवानीच. शिवाय दादांना उपजत विनोदाचे अंग असल्यामुळे त्यांच्या कथनाला एक अनोखा ढंग येत असे. या विनोदी स्वभावामुळे माणसे पण त्यांच्याकडे आकर्षित होत असत. व्यवस्थापनशास्त्र अस्तित्वात सोडा पण या-या शास्त्राचा जन्म होण्यापूर्वीच कै. दादा यांना उपजतच याचे ज्ञान होते. यास्तव घरातील पारंपरिक उत्सव, सण हे दादा नियोजनपूर्वक हाताळत. मनुष्यबळ पण नेमके हुडकून त्यांच्याकडून कार्य सिद्धीस नेण्याची विलक्षण हातोटी दादांच्या ठायी होती.
मोतीसारखा प्रति वाघ हा कुत्रा म्हणजे कर्दनकाळ. परंतु दादांची हाक ऐकल्यावर मेणाहून मऊ होत असे. विनोदप्रचुर बोलण्यामुळे दादाना कधी माणसांची कमतरता भासली नाही. आमचे पुरोहित कै. वासुदेव निगळ्ये असो किंवा पुजारी शंकर भट असो, आत्माराम कुंभार असो किंवा तुळसीवृंदावन रंगविणारे कै. भालचंद्र नाईक असो, दादांविषयी सगळ्यांनाच आदरभाव. मधुर वाणी हा दादांचा स्थायिभाव. यामुळे त्यांना विविध पेश्यातील, विविध स्तरातील व्यक्ती वश होत. सरंजामशाहीच्या काळात पण दादांनी कधी भेदभाव केल्याचे उदाहरण नाही. घरामागच्या तळीवर दादांबरोबर आंघोळ करताना तर मज्जाच मजा यायची. पावसाळ्यात ‘खवळ’ जातीची मासळी तळीच्या मागच्या बाजूला जाळी बसवून अलगद पकडायचे. याला विलक्षण चापल्य लागायचे.
कै. दादांना वनस्पती औषधींचे पण जुजबी ज्ञान होते. आमचे ज्येष्ठ बंधू जांभळे खाऊन पोटदुखीने तळमळत होते. यावेळी दादांनी कसलेतरी मूळ खायच्या पानातून दिले. त्यावेळी भावाला तत्काळ आराम मिळाल्याचे स्मरते. तसेच चर्मरोगावर दादांच्या पोतडीत रामबाण औषधे असत. दादांचा मुलांना धाक तसेच लळा. आमच्या वडिलांना ते ’सुलतान’ या टोपणनावाने लहानपणी हाक मारत. तर हे ‘सुलतान’ आजोबांच्या धाकाने लहानपणी दादांच्या ‘सालातच’ मुक्काम ठोकायचे. दादांचे संरक्षणकवच असताना कोणाची हिम्मत होणार बालमनाला दुखवायची? सोमनाथ विहिरीवर दादांकडून आम्ही पोहण्याचे प्राथमिक धडे घेतले. त्यांचे याबाबतीतले सहजसुंदर कसब वाखाणण्याजोगे. पाण्याची भीती मनातून कशी घालवायची याची प्रात्यक्षिके आम्ही दादांकडूनच घेतली.
दादांची आणखी एक आठवण माझ्या मनात रुतून राहिली आहे. गणेशचतुर्थीला कै. वासुदेव भटजींच्या मार्गदर्शनावरून दादा उत्तरपूजा सोवळे नेसून आटोपत अन् माटोळीचा ‘टाळा’ तोडल्यावर क्षणात अंतर्धान होऊन कोट, टोपी पेहरावात प्रगट होत. ‘तो मी नव्हेच’ पाहण्यापूर्वी दरवर्षी गणेशचतुर्थीला आम्ही हा दादांचा ‘पणशीकर’ विसर्जनावेळी पाहत होतो. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अचानक मेंदूतील रक्तस्रावाने आजारी झाले न् सारेच व्यथित. बहुत करून दादांचे घुमटवादनातील सहकारी. परंतु दैवी चमत्कार, इच्छाशक्ती अन् डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे दादांचे प्राण वाचले. प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी त्यावेळी गोवा मेडिकल कॉलेजात कार्यरत होते. नंतर साताठ वर्षे शांतपणे जीवन जगून कै. दादा १९८३ मध्ये शिगमोत्सवाच्या समाप्तीच्या शुभदिनी वारले. पणजीहून मी पेडण्याला पोचलो, त्यावेळीच मनात पाल चुकचुकली. मला गुलाल का लावला नाही हे त्यावेळी मला कळले नाही. परंतु लगेच पुढे कै. आबा देशप्रभूंचे बंद दुकान, धोकटी काखेला मारून घाईघाईत जाणारा न्हावी अन् नंतर मळीतल्या सदूकडून कानावर आदळलेली ती दुःखद बातमी. दादांचे ज्येष्ठ बंधू कै. श्रीराम देशप्रभू यांनी मोठे कर्तृत्व गाजवले.
टाटा कंपनीची स्कॉलरशीप घेऊन अमेरिकेला जाणारे ते पहिले गोवेकर. डॉ. भटनागरच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी वैद्यकीय संशोधन संस्था त्यांनी उभारल्या. परंतु दादांच्या ज्येष्ठ बंधूंनी दादांच्या योगदानाबद्दल आदरच बाळगला. प्रसिद्धीपराङ्मुख राहून आपल्या महत्त्वाकांक्षांवर पाणी सोडून त्यांनी घर राखले याचेच त्यांना फार कौतुक वाटे. दादा जाऊन तेहतीस वर्षे झाली, परंतु त्यांच्या स्मृती अजून मनात जाग्या आहेत.