दहा दिवस मुख्यमंत्र्यांच्याच खात्यांशी निगडीत प्रश्‍न!

0
199

>> १२ दिवसीय विधानसभा अधिवेशन उद्यापासून

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर जादा ताण येण्याची शक्यता आहे. बारा दिवसीय अधिवेशनात दहा दिवस मुख्यमंत्र्यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असणार आहेत. त्याच बरोबर आजारी असलेले वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या खात्याशी संबंधित प्रश्‍नांना मुख्यमंत्री पर्रीकर यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.

राज्य विधानसभेच्या उद्या गुरुवार १९ जुलैपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटांनी एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी जोरदार रणनीती तयार केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सत्ताधारी गटाच्या आमदारांची बैठक घेऊन अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा केलेली आहे. या पावसाळी अधिवेशनासाठी सदस्यांनी १७०० पेक्षा जास्त प्रश्‍न सादर केले आहेत.
१९, २६ जुलै आणि २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पर्रीकर, मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर, पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असतील. २०, २७ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, आरडीए मंत्री जयेश साळगावकर यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असतील.

२३ आणि ३० जुलै रोजी नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असतील.

२४ आणि ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री पर्रीकर, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असतील.
२५ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पर्रीकर, महसूल मंत्री रोहन खंवटे आणि पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या खात्याशी निगडीत प्रश्‍न असतील.

दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा
या अधिवेशनात सुरुवातीचे दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार आहे.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात केवळ अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अर्थसंकल्पावर सविस्तर विवेचन केले नव्हते. त्यामुळे अर्थसंकल्पातील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून काही नवीन योजनांबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दहा दिवस अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. सरकारच्या विविध खात्यांच्या विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे.