>> गोवा शिक्षण मंडळाचे परिपत्रक जारी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी नियुक्त शिक्षकांनी चुका केल्यास दंड ठोठावला जाणार असून दंडाची रक्कम मानधनातून कापून घेतली जाणार आहे. त्याच बरोबर परीक्षेसाठी नियुक्त करण्यात येणार्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
गोवा शिक्षण मंडळाच्या ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेत मानधन वाढ व दंडाविषयी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कार्यवाही मार्च २०१८ च्या परीक्षेपासून केली जाणार आहे. मंडळाचे सचिव एम. व्ही. गाडगीळ यांनी मानधन वाढ आणि चुकीबाबत होणार्या दंडाची माहिती असलेले परिपत्रक सलग्न सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना पाठविले आहे. मंडळाच्या मागील दोन वर्षांत दहावी, बारावी परीक्षेच्या काही पेपरमध्ये चूक आढळून आलेली आहे.
पेपरमध्ये चुका होऊ नये म्हणून दंडाची तरतूद करण्यात आली आहे.पेपर सेटिंग, भाषांतर आणि प्रूफ रीडींगमध्ये प्रत्येक चुकीसाठी ५ टक्के मानधन कापून घेण्यात येणार आहे. परीक्षा आयोजनातील प्रत्येक चुकीसाठी २५ रुपये, तसेच उत्तरपत्रिकेच्या व्हेरीफिकेशनच्या वेळी मूल्यांकनात चूक आढळून आल्यास प्रत्येक चुकीसाठी ३५ ते ५० रुपये कापून घेण्यात येणार आहेत. शिक्षकांकडून मोठी चूक आणि गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्यास प्रकरण कार्यवाहीसाठी मंडळाच्या कार्यकारी समितीपुढे नेण्यात येणार आहे. गैरप्रकारात मोडणार्या चुकांबाबत मंडळाची कार्यकारी समिती निर्णय घेणार आहे. कार्यकारी समितीचा निर्णय आमसभेसमोर ठेवण्यात येणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये सहभागी शिक्षक व इतर कर्मचार्यांच्या मानधनात वाढ केली आहे. मानधनाबाबत सविस्तर माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. परीक्षा मुख्य नियंत्रक (एकरक्कमी) ३ हजार रुपये, वरिष्ठ नियंत्रक (एकरक्कमी) २५०० रुपये, सहयोगी नियंत्रक आणि नियंत्रक (एकरक्कमी) २ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.