गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०१८ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के लागला आहे. वर्ष २०१७ मध्ये ९१.५७ टक्के निकाल लागला होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.३ टक्के एवढी घट झाली आहे.
मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दहावीचा निकाल पर्वरी येथे शिक्षण खात्याच्या सभागृहात काल जाहीर केला. या परीक्षेला १९५९८ विद्यार्थी बसले होते. त्यात मुलगे १०१६० आणि मुली १००९३ यांचा समावेश होता. त्यातील १७८८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ८८.६९ टक्के तर मुलींची टक्केवारी ९०.४९ टक्के एवढी आहे. या व्यतिरिक्त विषयाची सूट असलेले ६५५ विद्यार्थी बसले होते. त्यातील २५६ विद्यार्थी ( ३९.०८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान विषयाच्या नवीन पद्धतीची प्रश्न कठीण गेल्याची बरेच विद्यार्थी व पालकांची तक्रार होती. सर्वांत कमी निकाल विज्ञान विषयाचा ९२.३९ टक्के एवढा लागला आहे. गणित विषयाचा निकाल ९४.२५ टक्के, तर समाजशास्त्र विषयाचा निकाल ९६.१६ टक्के लागला आहे. विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
राज्यातील सर्वाधिक निकाल पणजी केंद्राचा ८९.१३ टक्के एवढा लागला आहे. पणजी केंद्रातून सर्वाधिक १८५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर सर्वांत कमी निकाल केपे केंद्राचा ८१.६७ टक्के एवढा लागला आहे. माशे केंद्रातून १७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या केंद्राचा निकाल ९६.६५ टक्के लागला आहे.
क्रीडा गुणांमुळे ४.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ८४५२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ मिळाला. त्यातील ३७६ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणामुळे उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील ३९० पैकी ७८ विद्यालयांचा १०० टक्के लागला आहे. त्यात २१ सरकारी विद्यालय आणि ५७ अनुदानित विद्यालयांचा समावेश आहे. फोंडा तालुक्यातील १८ टक्के विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सालसेत तालुक्यातील १४ टक्के, तिसवाडी आणि पेडणे तालुक्यातील १३ टक्के , बार्देश तालुक्यातील ११ टक्के, काणकोण तालुक्यातील १० टक्के, डिचोली तालुक्यातील ९ टक्के, वास्को तालुक्यातील ५ टक्के, धारबांदोडा तालुक्यातील ३ टक्के तर केपे, सांगे आणि सत्तरी तालुक्यातील १ टक्का विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
खास मुलांच्या पर्वरी येथील संजय स्कूल, लोकविश्वास प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय ढवळी, लोक विश्वास प्रतिष्ठान विराणी माध्यमिक विद्यालय – ढवळी आणि सेंट झेवियर अकादमी – ओल्ड गोवा या चार विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
एनएसक्यूएफ या विषयाचा फायदा २९७ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. राज्यातील केवळ सरकारी विद्यालयातून एनएसक्यूएफ हा विषय शिकविला जातो. २०३६ विद्यार्थ्यांनी सातवा विषय म्हणून एनएसक्यूएफ घेतला होता, असे सामंत यांनी सांगितले. पुरवणी परीक्षा १५ जून २०१८ पासून सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षा कुजिरा येथील डॉ. के.बी. हेडगेवार विद्यालय, म्हापसा येथील जनता विद्यालय, होली स्पिरिट मडगाव, फोंडा येथील एस. एस. समिती विद्यालय ढवळी आणि कुडचडे येथील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्युट या पाच केंद्रातून घेतली जाणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी ऑन लाइन पद्धतीने २९ मे ते ७ जून २०१८ पर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ७ जूननंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या पुरवणी परीक्षेला सुधारण्याची गरज आहे, असा शेरा असलेले विद्यार्थी बसू शकतात. तसेच गुणांची टक्केवारी वाढविण्यास इच्छुक विद्यार्थी बसू शकतात. विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी वाढविण्यासाठी दोन संधी दिल्या जातात, असेही सामंत यांनी सांगितले. विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी १ जूनपर्यंत, उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ५ जून आणि गुणांच्या पडताळणीसाठी २२ जून २०१८ पर्यत अर्ज करू शकतात, असेही सामंत यांनी सांगितले.