मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकीअर रेहमान लखवी याच्या तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लखवीला नजरकैदेत ठेवण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश इस्लामाबाद हायकोर्टाने फेटाळून लावल्याने लखवी तुरुंगाबाहेर येणार हे स्पष्ट झाले आहे.लखवीला पाकमधील विशेष न्यायालयाने १८ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या लखवीला जामीन मंजूर केल्याबद्दल भारत सरकारने पाकिस्तानकडे तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पाक सरकारने विशेष कायद्याचा वापर करून लखवीला ताब्यात घेऊन तुरुंगातच ठेवले होते. त्याचबरोबर या जामीनाविरुध्द पाक सरकारने इस्लामाबाद हायकोर्टात आव्हानही दिले होते. मात्र आता लखवीला ताब्यात घेण्याचे पाक सरकारचे आदेश हायकोर्टाने धुडकावल्याने लखवी मुक्त होणार आहे.
सध्या तो रावळपिंडी येथील तुरुंगात आहे. २००९ साली लखवी याच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली होती.