दहशतवादाला पाठबळ देणार्‍यांची गय करणार नाही : पंतप्रधान

0
66

येथील रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या विषयावरून अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधत दहशतवादाला पाठबळ देणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे ठणकावले. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेचाच शत्रू असून संपूर्ण जगालाच त्याचा फटका बसला असल्याने त्याचा पूर्ण विनाश ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. जटायूने सर्वप्रथम अशा दहशतवादाशी मुकाबला केला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

१९९२-९३ च्या कालावधीत अमेरिकी अधिकारी दहशतवाद हा तुमचा अंतर्गत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याचे सांगायचे. मात्र ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचाही या बाबतीतील दृष्टीकोन साफ बदलला. दहशतवाद ही सार्‍या जगाचीच समस्या बनली असून तो समाजाला लागलेला विषाणू आहे, असे मोदी म्हणाले. जगातील सर्व शक्तींनी एकसंधपणे या दहशतवादाशी लढा द्यायला हवा. भारत युध्दाची भूमी नसून बुध्दाची भूमी आहे. भारत बुध्दांच्या मार्गावरून चालतो, असेही ते म्हणाले.