दशावतार परंपरेची विविध रूपे

0
862

– डॉ. पांडुरंग फळदेसाई

गोव्यात आणि कोकणातील मंदिरांमधून जत्रा आणि उत्सवांचा हंगाम सुरू झाला म्हणजे लोकप्रिय अशा दशावतार लोकनाट्य सादरीकरणाचे वेध ग्रामीण नाट्यरसिकांना लागतात. या पुरातन अशा दशावतार संकल्पनेचा उगमापासूनचा वेध घेणारा हा अभ्यासपूर्ण आणि संग्राह्य लेख…

दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. मानवधर्माचे रक्षण करण्यासाठी विष्णू या दैवताने घेतलेली दहा रूपे. ही रूपे आपण साहित्य आणि विविधरंगी कलांच्या माध्यमातून अनुभवत आलो आहोत. गोवा आणि कोकण प्रांतांत दशावताराची प्रदीर्घ परंपरा आहे. लोकनाट्ये आणि लोकनृत्यांतून ती दृग्गोचर होते. मूळ ‘दशावतार’ या संकल्पनेला आणि त्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या साहित्य आणि कला प्रकार यांना एक प्रदीर्घ अशी प्राचीन परंपरा आहे. या परंपरेचा अल्प स्वरुपातील स्रोत वेदकाळात दिसत असला तरी पुराणकाळात मात्र दशावतार संकल्पनेचा विस्तार प्रचंड प्रमाणात झालेला दिसतो. आपली पुराणे आणि प्राचीन संहिता यांमधून दशावतार संकल्पनेची विविध रूपे प्रतिबिंबित झालेली दिसतात. भागवतपुराणात तर विष्णूची अशी स्तुती दिसते की वाचून मन थक्क व्हावे. एखाद्या अक्षय तलावातून सर्व दिशांनी सहस्रावधी स्रोत वाहावेत तसे श्रीविष्णूचे असंख्य अवतार जन्माला आले आहेत असे वर्णन भगवद्पुराण करताना दिसते.

आपल्याकडे त्रिमूर्तीची संकल्पना रूढ आहे. ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी ही शाश्‍वत कालचक्राची तीन रूपे. त्यामुळे विष्णू हा स्थितीचा निदर्शक आहे. स्थिती म्हणजे सातत्य. सृष्टीतील शाश्‍वत कल्याणाचा विष्णू हा उदात्त स्रोत मानला गेला आहे. देव जगाची निर्मिती करतो आणि तिथे एखाद्या अभिनेत्यासारखा विविध भूमिका रंगवितो असे भगवद्पुराण म्हणते. तर गीतेत देव दुष्टांच्या निर्दालनासाठी जन्म घेतो असे वर्णन सापडते. पुरातन साहित्यात विष्णूच्या अवतारांबद्दल एकवाक्यता दिसत नाही. फक्त मत्स्यपुराणात निःसंदिग्धपणे दहा अवतार दिसतात. अहिर्बुद्न्य संहितेत ते तब्बल एकोणचाळीस तर भगवद्पुराणात चौवीस तसेच महाभारताच्या नारायणीय सर्गात सहा अवतार सांगितलेले दिसतात. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण (अथवा बलराम), बुद्ध आणि कल्की या दहा अवतारांना सर्वसामान्यपणे दशावतार म्हणण्याची परंपरा आहे.

दशावतारांविषयीच्या मिथककथा
वामन अवताराच्या कथेचे मूळ ऋग्वेद आणि शतपथ ब्राह्मणापर्यंत पोचलेले दिसते. काही ब्राह्मणे आणि आरण्यकांनुसार मत्स्य, कूर्म आणि वराह ही रूपे प्रजापतीने घेतली. तैत्तरीय आरण्यकानुसार आदिम काळात प्रजापतीने शंभर हातांच्या काळ्या डुकराचे रूप घेऊन पृथ्वी वर उचलून घेतली. माशाच्या रूपातील प्रजापतीने मनूला जलप्रलयातून तारले. वेदकाळात विष्णू हा एक क्षुल्लक देव होता. नंतरच्या काळात त्याची कीर्ती आणि दर्जा या दोहोत वाढ झाली. त्यानंतर विष्णूच्या भक्तांनी या सगळ्या मिथककथा विष्णूला चिकटवून सोडल्या. महाकाव्ये आणि पुराणांनी त्या एकत्रितपणे विष्णूकथेला जोडून टाकल्या. त्याचाच परिपोष म्हणजे आजवर चालत आलेली दशावतार ही दहा अवतारांची आणि त्या अवतारांना जोडलेल्या कथांची संकल्पना.

शिलालेख आणि चित्रफलकांचे संदर्भ
जसजसा भागवत संप्रदायाचा प्रसार वाढत गेला, तसतशी विष्णूच्या दशावतारांची संकल्पना दृढ होत गेली. कौस्तीपुत्र भगभद्र याची सुंग राजवट चालू असतानाची एक गोष्ट सांगतात. सनपूर्व दुसर्‍या शतकातील ही गोष्ट. त्याच्या दरबारात हेलिओदोरस नावाचा ग्रीक राजदूत होता. तो विष्णूचा भक्त होता! त्याने एकाच अखंड पाषाणातून दहा मीटर लांबीचा कोरीव गरुडस्तंभ करून तो वासुदेवाच्या सन्मानार्थ उभारला आणि स्वतःला ‘भागवत’ म्हणून जाहीर केले. गुप्त सम्राटांनीदेखील भागवत संप्रदायाचा पुरस्कार केला. त्यामुळे या संप्रदायाला अधिक चालना मिळाली. वैष्णवभक्त असलेल्या दुसर्‍या चंद्रगुप्ताने स्वतःच्या नावामागे ‘पामर भागवत’ असे बिरुद लावले होते. इसवी सन ५०० मध्ये देवगड येथे बांधलेले विष्णूचे मंदिर हे ‘दशावतार मंदिर’ म्हणून नावारूपाला आले. आठव्या शतकातल्या मल्लपुरम् शिलालेखात विष्णूच्या दशावतारांचा उल्लेख मिळतो. वेरुळच्या लेण्यात तर कैलासमंदिर आणि गुंफांच्या रूपाने विष्णूच्या दशावतारांचे शिल्पदर्शनच घडते. विविध अवतारांचे संदर्भ देणारे शिलालेख आणि लाकडी चित्रफलकही सापडले आहेत. विष्णुपूरच्या मल्ल राजाने दशावतारांवर आधारित खेळातील गोलाकार पत्ते तयार केले होते. संपूर्ण संचात एकशे वीस पत्ते होते. ते दहा विभागांत विभागलेले आणि प्रत्येक भागाला दशावतारातले एकेक नाव देण्यात आलेले.

देवांना खूश करण्यासाठी नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या रूपाने देवांची सेवा करावी असे पुराणे सुचवितात. कृष्णाविषयीची नाट्यरूपे जरी प्राचीन असली तरी ती नेमकी कोणत्या काळात सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. नाटक हे ईश्‍वरसेवेचे एक मोठे साधन असल्याचे आपली परंपरा मानत आली आहे. भरत नाट्यशास्त्रानुसार देवाला सुवासिक फुले आणि उदबत्त्या लावल्यानंतर देव जेवढे खूश होतात, त्यापेक्षा एखादे नाटक सादर केल्यास ते अधिक प्रसन्न होतात. भगवद्पुराणात विष्णू म्हणतो, ‘‘धार्मिक उत्सवांच्यावेळी माझ्या भक्तांनी देवळात माझ्या लीलांचे सादरीकरण करावे.’’ विष्णूसमोर लावण्यवती युवतींनी उत्कट प्रतिभेने सादर केलेले नृत्य म्हणजे ‘प्रेक्षा.’ या प्रेक्षांचा उल्लेख दहाव्या शतकातील शिलालेखांत सापडतो. प्रेक्षा सादर करणारी मंडळी ती ‘प्रेक्षणके.’ श्रीकृष्णाच्या देवळांसमोर नाटके सादर करणार्‍या प्रेक्षणकांना जमिनी दान दिल्याचे उल्लेखही सापडतात. भगवान नारायण विष्णूच्या मंदिरात संगीतिका सादर केल्याचा संदर्भ वरूरूचीच्या ‘उभयसारिकाभान’ या ग्रंथात मिळतो. तसेच ‘राजतरंगिणी’त केशवमंदिरात नृत्य सादर करावयाच्या परंपरेचा उल्लेख सापडतो. भुवनेश्‍वरच्या अनंत-वासुदेव मंदिरातील शिलालेखात गान-नृत्य-कुशल अशा शंभर मृगनयनींचा उल्लेख आहे. या मृगनयनी म्हणजे नृत्य-नाट्य सादर करणार्‍या कलावती होत्या हे वेगळे सांगायला नको. बाराव्या शतकात नाटमंदिरात दशावतार संकल्पनेवरील नृत्ये सादर होत असल्याचा साहित्यिक पुरावा उपलब्ध आहे.

गीत-गोविन्द काव्य आणि दशावतारांचा प्रसार
कृष्णभक्तीचे ओजस्वी काव्य म्हणजे ‘गीतगोविन्द.’ ते बाराव्या शतकातील श्रेष्ठ कवी जयदेवाने रचले. त्याची पत्नी पद्मावती ही पुरीच्या जगन्नाथ मंदिरात नृत्य सादर करणारी एक कलावती होती. जयदेव अजरामर स्वरुपाची काव्यरचना करीत असे आणि पद्मावती त्या काव्याचे उत्कट नृत्यदर्शन जगन्नाथ मंदिरात घडवीत असे. वैष्णव संप्रदायाचे महान समर्थक गंगासम्राटांच्या काळात पुरीचे जगन्नाथ मंदिर म्हणजे वैष्णव कला आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. जयदेवाच्या गीत-गोविन्दमधील पहिल्या सर्गातील अष्टपदी दहा अवतारांना समर्पित केली आहे. तो सर्ग जगन्नाथ मंदिरात पूर्वरंगाच्या स्वरुपात शेकडो वर्षे होत राहिला. त्यामुळे गीत-गोविन्द आणि दशावतार यांचा प्रचार-प्रसार सर्वत्र होत गेला. त्याचाच परिणाम म्हणून केरळातील कथकली नृत्यनाट्याच्या पूर्वरंगात गीत-गोविन्दमधील रचनांच्या गायनाचा दंडक आहे. तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात गीत-गोविन्दचे हस्तलिखित अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. जयदेवाच्या या अजरामर काव्याचा परिणाम भारतातील अनेक नाट्यपरंपरांवर आणि दशावतार संकल्पनेच्या प्रकटीकरणावर झालेला दिसतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून केरळच्या कृष्णाट्टम या लोकनाट्याचे घेता येईल. जयदेवाची ‘दशावतार अष्टपदी’ सर्व दिशांनी लोकप्रिय झाली आणि त्यातून दशावतारविषयक नाटके सुरू झाली असावीत.

दशावतार परंपरेचा मागोवा घेतला तर एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते, ती म्हणजे, वैष्णवांच्या मंदिरांतून होणार्‍या उत्सवांत दशावतार नृत्य-नाट्य पूर्वरंगाच्या स्वरुपात येत होते. तेच पुढे दशावतार नावाने प्रचलित झाले. आसामचे नाट्याचार्य शंकरदेव यांच्या एका अंकिया नाटकात ‘मुक्ती मंगल भतिमा’ हे आशीर्वादाचे गीत दशावतारास समर्पित केले आहे. आसामच्या सत्रिय नृत्यशैलीत ‘केली गोपाळ नट’ हा भतिमा म्हणून दशावतारी नृत्य नावाचे स्वतंत्र नृत्य सादर केले जाते. रामदासांच्या सतराव्या शतकातील दासबोधात दशावतारी नाटक करणार्‍या धटिंगणांनी सादर केलेल्या सुंदर नारींचा उल्लेख येतो. त्याच सुमारास कर्नाटकात यक्षगान नाट्यप्रकाराचा उदय झाला. परंतु त्या नाट्यप्रकाराला ‘दशावतार-आटा’ असे म्हणत. विष्णूच्या दहा अवतारांच्या कथा नाट्यरूपाने सादर करणारे नाट्य म्हणून त्याला हे नाव पडले. ऐतिहासिक नोंदीनुसार पहिले यक्षगान नाटक म्हणजे सन १५६४ सालचे ‘विराट पर्व.’ दशावतार आटांत संपूर्ण दहा अवतारांचे दर्शन अखेरच्या ‘मंगलगीतात’ असते आणि एखाद्याची कथा नाट्यरूपात सादर केली जाते.

तंजावर प्रदेशात दशावतार
तंजावरचे मराठे राजे कला आणि संस्कृतीचे मोठे आश्रयदाते होते. ते असामान्य प्रतिभेचे लेखकदेखील होते. तंजावरचे दुसरे मराठा राजे शाहराज भोसले (१६८४-१७११) याना तर ‘कविभोज’ असे म्हटले जाई. त्यांनी तेलगू, हिंदी, तामीळ आणि मराठी भाषेत अनेक नाटके लिहिली. ‘पंचभाषाविलास’ हे त्यांचे पाच भाषांतून लिहिलेले नाटक. त्यातल्या पाच नायिका पाच वेगवेगळ्या भाषांतून गीते गाऊन विष्णूची स्तुती करतात. ते गीत जयदेवाच्या मूळ गीत-गोविन्दमधून प्रेरणा घेऊन लिहिले आहे यात शंका नाही. शाहराज भोसलेंच्या ‘हरिहरविलास’ नाटकात सूत्रधार स्वतःला ‘भागवत दशावतारी’ म्हणवून घेतो. तो अधूनमधून वेश पालटून दहा अवतारांची सोंगे वठवितो.

भागवत किंवा सूत्रधार देवळांमधून होणार्‍या नृत्यनाट्यांमध्ये दशावतारी पात्रांचा समावेश करीत. प्रारंभी दशावताराचे गीत गाऊन सादरीकरणाला सुरुवात केली जात असे. त्या गीतांच्या वेळी काही कलाकार संवाद आणि अभिनय करून त्या अवतारांचा दृष्यपरिणाम साधत असत. नंतरच्या काळात एक-दोन अवतारांची पौराणिक कथा गुंफून ती दशावतारविषयक गीताचा पूर्वरंगातील प्रमुख हिस्सा बनला असावा. अशा प्रकारे देशातील विविध भागांत दशावतार नाटकांची परंपरा वेगवेगळ्या पद्धतीनी रूढ झाली.
दशावतार नाट्यसंकल्पनेच्या संदर्भात विचार करताना गोवा आणि कोकण ही नाट्यकलेची मूळपिठे म्हणता येतील. वैष्णव संप्रदायाची नाटके गोवा आणि कोकणातील मंदिरांच्या आश्रयामुळे बहरली. ‘जागर’ हे गोव्याचे आदिम लोकनाट्य. रंगविलेल्या लाकडी मुखवट्यांच्या आधारे ते सादर केले जाई. त्यात प्रारंभी जंगली पशू आणि पक्ष्यांच्या प्रतिकृती सांगणारे मुखवटे होते. पुढील काळात पुराणांचा प्रभाव आला आणि त्यात अनेक मुखवट्यांची भर पडली. त्यानंतरच्या काळात वैष्णव संप्रदायाच्या प्रसाराचा भाग म्हणून गोव्यात आणि कोकण प्रांतात दशावतारावर आधारलेल्या नाटकांची परंपरा सुरू झाली. कोकण प्रांतातल्या कलाकारांनी चेरासम्राट संगुट्टवान याचे मनोरंजन केले असा उल्लेख ‘शिलप्पाधिकारम्’ या श्रेष्ठ तामीळ काव्यात मिळतो.

‘जागर’ या लोकनाट्याची मूळ संकल्पना थोडीशी दुर्बोध असल्याने पुढे मधू, कैटभ आणि हयग्रीव (शंखासुर) यांच्या वधाची कथानके जागराला जोडण्यात आली. त्यातून दैत्यां जागर, शंखासुर कालो, गवळणकालो अशी विविध कथानकस्वरूप लोकनाट्ये प्रचलित झाली. शंखासुरकाल्यात विष्णूचा पहिला अवतार- मत्स्यावतार प्रकट होऊन शंखासुराने ब्रह्मदेवाकडून हिसकावून घेतलेले वेद शंखासुरवध करून परत मिळवितो. शिवाय बाळकृष्णाने केलेल्या पूतनावधाचे कथानक सादर केले जाते. कृष्णाच्या लीलांवर आधारित बालक्रीडा कालो अथवा गवळणकालो आणि दहिकालोदेखील सादर केला जातो. त्याबरोबरच दशावतारावर आधारलेले एखादे आख्यान नाट्यरूपाने विस्ताराने सादर केले जाते. त्याला दशावतारी नाटक अथवा दक्षिण गोव्यात ‘खेळ’ असे म्हणण्याची परंपरा आहे. कोकणात शंखासुरवधाचा पूर्वरंग झाल्यावर नाट्यरूपाने विष्णूच्या अवताराची कथा सादर केली जात असे. परंतु अलीकडे पूर्वरंगचे स्वरूप अत्यंत त्रोटक आणि प्रातिनिधिक केलेले दिसते. आताशा मोचेमाड आणि आसपासच्या परिसरात दशावतार सादर करणारी पारंपरिक पथके (मंडळी) आहेत. ते कलाकार उत्तर गोव्यातील मंदिरांतून होणार्‍या उत्सवांच्यावेळी दशावतारी नाटके सादर करून ग्रामीण कलाप्रेमींचे मनोरंजन करतात.

भारतभरातील दशावतारदर्शन
अन्य प्रदेशांतील दशावतार परंपरेचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट धान्यात येते. ती म्हणजे, ही परंपरा देशात सर्वत्र विविध रूपात दिसते. गुजरातेतील गोफ आणि रास हे नृत्यप्रकार म्हणजे विष्णूच्याच कृष्णावताराची रूपे. केरळमधील कथकली आणि कृष्णाट्टम, कर्नाटकातील यक्षगान अथवा दशावतार आटा, आंध्रमधील कुचिपुडी, तामीळनाडूचा भागवत मेळा, आसामातील अंकिया नट, उत्तर प्रदेशमधील लीला, मणिपूर आणि गुजरातमधील रास, महाराष्ट्रातील लळीतचा पूर्वरंग ही सर्व दशावतार संकल्पनेची विविध रूपं आहेत.
कृष्णाविषयीच्या नाटकांचा काळ किती जुना असावा याचा अंदाज सनपूर्व ४०० वर्षी भासाने रचलेल्या ‘बालचरितम्’ या ग्रंथावरून येतो. त्यात भासाने प्रारंभीच्या श्‍लोकात विष्णू-नारायण, विष्णू-वामन, राम आणि कृष्ण या अवतारांचा उल्लेख केलेला दिसतो. शिवाय त्याच्या ‘कर्णभारम्’ नाटकात नृसिंह अवताराचा उल्लेख मिळतो. ‘सनातन दैवत नामावली’ची (दशावतार) प्राचीनता बाराव्या शतकापर्यंत जाते असे डॉ. हरिप्रसाद शास्त्री यांचे मत आहे. या सर्व विवेचनावरून आपल्या देशात चालत आलेल्या दशावतार संकल्पनेची प्राचीनता ध्यानात येईल.