दर चौरस कि.मी. मागे चारपेक्षा अधिक रुग्ण

0
327

>> राज्याच्या एक टक्क्याहून अधिक लोकसंख्येला कोरोना

राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने १७ हजाराचा टप्पा पार केला असून राज्याचा ३७०२ चौरस किलोमीटरचे एकूण क्षेत्रफळ विचारात घेता सध्या सरासरी दर चौरस किलोमीटरमागे किमान चार कोरोना रुग्ण असे प्रमाण बनले आहे. राज्याची १५,४०००० लोकसंख्या गृहित धरता एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्याहून अधिक नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होत असून देशामध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.

नवे ४५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ३६३५ एवढी झाली असून एकूण रुग्णसंख्या १७००४ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ५ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत १८३ बळीची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

मडगाव येथील ६८ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात शनिवारी निधन झाले. वास्को येथील ७२ वर्षाच्या महिला रुग्ण, पेडणे येथील ५० वर्षाच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये काल निधन झाले. नावेली येथील ७५ वर्षाच्या पुरुष रुग्ण, वेर्णा येथील ६० वर्षीय महिला रुग्णाचे गोमेकॉमध्ये निधन झाले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित आणखी ४५७ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३,१८६ एवढी झाली आहे. गोमेकॉच्या आयसोेलेशन वॉर्डात ११८ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहेत.

होम आयसोलेशनच्या पर्यायामुळे सरकारी यंत्रणेवरील बराच ताण कमी होण्यास मदत होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या आणखी २२५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोेलेशनखालील रुग्णांची संख्या ५०२८ एवढी झाली आहे. आरोग्य खात्याने २१३२ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कोविड प्रयोगशाळेतून २२२९ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील २४४ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.