दर उतरले; गोमंतकीयांकडून मानकुरादची लयलूट

0
25

>> दर दीड हजारांवरून पाचशेवर; पणजी, म्हापसा, मडगाव बाजारपेठांत आंब्याची आवक वाढली

गेल्या एप्रिल महिन्यात बाजारात अगदीच अल्प प्रमाणात दिसणार्‍या गोव्याच्या जगप्रसिद्ध मानकुराद आंब्याची आवक वाढली असून, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. एप्रिल महिन्यात १२०० ते १५०० रुपयापर्यंत एक डझन या दराने विकला जाणारा हा आंबा आता ३०० ते ५०० रुपये प्रति डझन या दराने मिळू लागला आहे. त्यामुळे मानकुरादप्रेमी गोमंतकीय ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र पणजी, म्हापसा, मडगाव व अन्य ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये दिसत आहे.

विशिष्ट चवीमुळे गोमंतकीय हापूसपेक्षा मानकुराद आंब्याला अधिक पसंती देतात. तसेच काही मानकुरादप्रेमी त्यासाठी मिळेल त्या दराला त्याची खरेदी करण्याची तयारी ठेवत असतात. आता दर मानकुरादचे दर खाली उतरल्याने मानकुरादप्रेमी सुखावले आहेत. या आंब्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, पंचतारांकित हॉटेलात मागणी आहे. केवळ गोव्यातील या आंब्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात येणारे जीआय मानांकन मिळाले आहे.

एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मानकुराद आंबा बाजारपेठेत दाखल झाल्याचे आंब्याचे दर झपाट्याने खाली असल्याचे मत आंबा विक्रेत्यांनी व्यक्त केले. हा आंबा जास्त काळ टिकत नाही. तसेच लहरी हवामानाचाही या आंब्यावर लगेच प्रभाव पडतो. त्यामुळे महिन्याच्या पहिल्याचा आठवड्यात बागायतदारांनी आंबा काढून बाजारात विक्रीला आणण्याचे सत्रच सुरू केल्याने बाजारपेठेत सर्वत्र केवळ आंबे अन् आंबेच दिसू लागले असून, दर देखील खाली आहेत. परिणामी हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले असून, मानकुरादप्रेमी गोमंतकीयांनी त्याची खरेदी जोरात सुरू केली आहे.

मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात अधूनमधून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असतात. तसेच सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंबे झडून पडतात. त्यामुळे बागायतदारांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडावरील आंबे काढणीला सुरुवात केली आहे. परिणामी मानकुराद मुबलक प्रमाणात बाजारात आल्याने बागायतदारांचे नुकसान झाले असले तरी ग्राहकांना स्वस्त तो उपलब्ध झाल्याने त्यांची एक प्रकारे चंगळच झाली आहे.

मडगावातही मानकुराद आंबा खरेदीसाठी गर्दी

गोव्यातील आंब्याचा राजा मानकुराद या दिवसात मडगाव बाजारात देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. मानकुराद खरेदीसाठी स्थानिक तसेच परराज्यातील पर्यटक गर्दी करत आहेत. येथील पिंपळकट्टा रस्त्यावर पन्नास पेक्षा जास्त विक्रेते मानकुरादची विक्री करत असल्याचे दररोज पाहायला मिळते. तसेच आबाद फारिया रोड, एसजीपीडीए बाजार, आके, रावणफोंड येथेही आंबा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.