राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थानिक निवडणूक कार्यालयाला एक पत्र पाठवून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे.
दक्षिण गोव्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची विकासकामे हाती घेण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. मुख्य सचिव राय यांनी मागील आठवड्याच्या शेवटी येथील निवडणूक कार्यालयाला यासंबंधीचे पत्र पाठविले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मार्च २०१९ मध्य्े लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. आचारसंहिता कार्यरत असल्याने कोणतेही काम हाती घेणे शक्य नाही. तसेच कुठलेही काम हाती घेण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामावर आचारसंहितेमुळे बंधन आलेले आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील निवडणूक आचारसंहिता शिथिल केल्यास पावसाळ्यापूर्वीची विकासकामे हाती घेतली जाऊ शकतात, असे पत्रात म्हटले आहे.