‘त्या’ सहा नद्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही ः मुख्यमंत्री

0
123

>> एनएच १७ वरील घरांचे योग्य पुनर्वसन करणार

राष्ट्रीय महामार्ग १७ या चौपदरीकरण व सहापदरीकरणासाठी ज्या ज्या लोकांची घरे पाडावी लागतील त्या सर्व घर मालकांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावस्कर यानी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला प्रवीण झांट्ये यानी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. प्रवीण झांट्ये यानी यावेळी ज्या लोकांची घरे वाचवणे शक्य आहे ती वाचवण्यात यावीत, काही लोकांची घरे मोडण्याची गरज नसताना ती मोडण्यासाठीची तयारी सार्वजनिक बांधकाम खात्याने केली असल्याचा आरोप झांट्ये यांनी यावेळी केला.

गोव्यातील ज्या सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे त्या नद्यांचे गोवा सरकार खासगीकरण करू देणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिले. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

या नद्यांतून राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पीपीपी तत्वावर ते करू पाहत आहे, अशी माहिती आपणाला माहिती हक्क कायद्याखाली मिळाली असल्याचे रेजिनाल्ड यांनी यावेळी सांगितले. छोटे मच्छिमार व अन्य लोकांचे जीवनमान या नद्यांवर आधारित असून त्यांचे खासगीकरण झाल्यास हे लोक देशोधडीला लागतील, अशी भीती रेजिनाल्ड यांनी व्यक्त केली व सरकारने तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध करण्यात येईल, असे सांगतानाच या नद्यांचे खासगीकरण केले जाणार नाही, असे आश्‍वासन सावंत यानी द्यावे, अशी मागणी रेजिनाल्ड यानी यावेळी केली.
यावर उत्तर देताना सरकार ह्या नद्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे आश्‍वासन सावंत यांनी दिले.

सहा नद्यांपैकी साळ ही नदी राष्ट्रीय जलवाहतुकीसाठी योग्य नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. मात्र, आपण त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना सर्व सहाही नद्या जलवाहतुकीसाठी योग्य असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असल्याची खोटी माहिती बंदर खात्याच्या मंत्र्याने दिली असल्याचे रेजिनाल्ड यानी यावेळी सभागृहात सांगितले. त्यावर आपण त्यासंबंधीची योग्य ती माहिती मिळवून तुम्हाला काय ते कळवतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी यावेळी रेजिनाल्ड यांना दिले.